Suruchi Adarkar : सोज्वळ भूमिकांना छेद देत सुरुची आडारकर साकारणार 'ग्लॅमरस खलनायिका'; लूक आऊट होताच 'अशी' होती पती पियुष रानडेची पहिली प्रतिक्रिया
Suruchi Adarkar : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री सुरुची आडारकरची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत पहिल्यांदाच ती खलनायिका म्हणून दिसणार आहे.
Suruchi Adarkar Entry in Satvya Mulichi Satavi Mulgi : 'का रे दुरावा' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सुरुची आडारकर (Suruchi Adarkar) पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरुची अभिनेता पियुष रानडेसोबत लग्नबंधनात अडकली. आता लग्नानंतर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेच्या माध्यमातून सुरुची प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आव्हानात्मक भूमिका करताना सुरुचीला येतेय मजा
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत सुरुची आडारकर नागिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या खलनायिकेचा ग्लॅमरस लक्षवेधी लूक नुकताच आऊट झाला आहे. या भूमिकेबद्दल एबीपी माझाशी बोलताना सुरुची म्हणाली,"सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतील नागिणीची भूमिका नेहमीच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहेच. आतापर्यंत साकारलेल्या सर्व भूमिका सकारात्मक आहेत. त्यामुळे ही भूमिका चॅलेजिंग आहे. आतापर्यंतच्या भूमिका साध्या, सरळ होत्या. पण गेटअपपासून ही भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. अशापद्धतीची भूमिका साकारताना नक्कीच मजा येत आहे".
चॅलेंजिंग भूमिका साकारताना सुरुचीने काय मेहनत घेतली?
सुरुचीसाठी नागिणीची भूमिका खूपच चॅलेंजिंग होती. या भूमिकेसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. त्याबद्दल बोलताना ती म्हणते,"माझ्या पात्राचा मी अभ्यास केला आहे. त्यासाठी वाचन केलं आहे. पात्राचं वेगळेपण कसं सिद्ध करू शकतो, यावर विचार केला आहे. आवाजात मॉड्युलेशन, बॉडी लँग्वेज या सगळ्याबाबत मी अभ्यास केला आहे. आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे".
अन् सुरुचीने मालिका करण्याचं ठरवलं...
सुरुची पुढे म्हणते,"आलेल्या संधीचा मी खूप विचार करत नाही. झी मराठीसारखं चॅनल, आयरीससारख्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरअंतर्गत 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेची निर्मिती होत असल्याने मला नाही म्हण्यासारखं काहीच नव्हतं. लग्न झाल्यानंतर लगेचच मला मालिकेसाठी विचारणा झाली होती आणि मी माझा होकार कळवला".
सुरुचीचा खतरनाक लूक पाहिल्यानंतर पियुषची काय प्रतिक्रिया होती?
सुरुचीचा खतरनात लूक चाहत्यांसह पती पियुषच्याही (Piyush Ranade) पसंतीस उतरला आहे. त्याच्या रिअॅक्शनबद्दल बोलताना सुरुची म्हणते,"प्रोमो आणि लूक पाहून पियुष खूप खुश होता. त्याचं हेच म्हणनं होतं की, नेहमीपेक्षा हे वेगळं असणार आहे. नेहमीच्या पात्रांसारखं हे पात्र नसून हे एक काल्पनिक पात्र आहे. आपण जसं उभं करू तसं हे असणार आहे. त्याला लूक आणि प्रोमो दोन्ही आवडलं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तो कायमच मला पाठिंबा देत असतो. तो माझ्याबद्दल खूप सकारात्मक आहे".
पियुष आणि सुरुची पुन्हा एकत्र कधी दिसणार?
'अंजली' या मालिकेत सुरुची आणि पियुषने एकत्र काम केलं होतं. त्यांच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आता पुन्हा एकदा दोघांना एकत्र एखाद्या कलाकृतीत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. याबद्दल बोलताना सुरुची म्हणते,"पियुष आणि मला पुन्हा एकदा व्यावसायिकरित्या पुन्हा एकदा एकत्र काम करायला नक्कीच आवडेल. एखादी छान वेगळी गोष्ट असेल, पात्र वेगळी असतील तर नक्कीच दोघांना एकत्र काम करायला आवडेल. पण आता सध्या आम्ही दोघंही आपापल्या कामात व्यस्त आहोत".
चाहत्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे : सुरुची अडारकर
सुरुची आडारकर ही मनोरंजनसृष्टीतील अशी अभिनेत्री आहे की जिचं नाव कधीच कोणासोबत जोडलं गेलं नाही. पण लग्नाची बातमी शेअर करत तिने चाहत्यांना खुश केलं. चाहत्यांना जणू काही सुखद धक्का बसला. पण दुसरीकडे तिला थोडा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणते,"लोक काय म्हणतात हा त्यांचा विचार आहे. मी माझ्या काही लोकांसाठी ज्यांनी आजवर माझ्यावर, माझ्या कामावर प्रेम केलं.. पियुषलाही त्याच्या कामासाठी भरभरुन प्रेम दिलं, आशीर्वाद दिला आहे अशा लोकांचा आदर ठेवत मी आमची बातमी शेअर केली. आणि ते तेवढ्यापुरतचं होतं. त्याच्यापुढे कोणाला काय वाटतंय, कोण काय बोलतंय याकडे आमचं कधीही लक्ष नव्हतं. चाहत्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे होते. आमच्या लग्नात आमचे आई-बाबा आनंदात आमच्यासोबत आमच्या आनंदात सहभागी झाले होते. हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे".
संबंधित बातम्या