अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोलच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन
अमृता आणि आरजे अनमोल यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्री अमृता रावला पुत्ररत्न झालं असून चाहत्यांकडून अमृताला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल यां दोघांनी यासंदर्भातील माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. त्याचसोबतच त्यांनी अमृता आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं. चाहत्यांकडून अमृता राववर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचसोबत सगळे अमृताच्या बाळाचं नाव जाणून घेण्यासाठी आणि त्याचा पहिला फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
अमृता आणि आरजे अनमोल यांच्या कुटुंबियांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, 'कुटुंबात नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे सर्वच अत्यंत आनंदी आहेत. तसेच अमृता आणि आरजे अनमोल दोघांनीही चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी आभार मानले आहेत.' अमृता रावने 2016 मध्ये आरजे अनमोलसोबत लग्न केलं होतं.
अमृता रावने आपली प्रेग्नेंसीची बातमी सीक्रेट ठेवली होती. प्रेग्नेंसीच्या शेवटच्या महिन्यात ती बेबी बंपसोबत आउटिंग करताना दिसून आली होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावर अमृताने स्वतः चाहत्यांची माफी मागत गुड न्यूज शेअर केली होती.
अत्यंत हटके अंदाजात अमृताने गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने लिहिलं होतं की, 'मला खूप आनंद होत आहे की, मी ही गोड बातमी माझे मित्र आणि चाहत्यांसोबत शेअर करत आहे. त्याचसोबत मी तुम्हा सर्वांची माफी मागत आहे, कारण ही बातमी माझ्यामुळे फार उशिरा तुमच्यापर्यंत पोहोचली. परंतु, ही बातमी खरी असून मी लवकरच बाळाला जन्म देणार आहे.'
अभिनेत्रीने पुढे लिहिलं होतं की, 'माझ्यासाठी आणि माझा पती अनमोलसाठी आतापर्यंतचा प्रवास खरचं फार उत्साह देणारा होता. आमच्या कुटुंबियांचीही आम्हाला नेहमीच साथ मिळाली. आम्हाला आशिर्वाद दिल्याबद्दल आम्ही सर्वाचे आभार मानतो.'
दरम्यान, अमृता राव 'इश्क विश्क', 'मैं हूं ना' आणि 'विवाह' यांसारख्या चित्रपटांमधून झळकली आहे. अमृताच्या कामासंदर्भात बोलायचं झालं तर, अमृता सर्वात शेवटी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'ठाकरे' या चित्रपटात दिसून आली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
