(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्होग इंडियाच्या मुखपृष्ठावर आली मिथिला पालकर
मिथिला पालकर हे नाव ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवं नाही. मराठी रसिकांना तर नाहीच नाही. कारण मिथिलाने अनेक मराठी सिनेमांत कामं केली आहेत.ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा नवा चेहरा म्हणून तिला आता व्होग या मासिकाने मुखपृष्ठावर स्थान दिलं आहे.
मुंबई : इंडस्ट्रीमध्ये अनेक मुली आपलं नाव कमवायला येत असतात. अनेकींना नायिका व्हायचं असतं. भरपूर पैसा, प्रसिद्धी मिळवायची असते. पण त्यासोबतच त्यांना मॉडेलही व्हायचं असतं. त्यांना अनेक मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकायचं असतं. पण बऱ्याचदा ती संधी येण्यासाठी एकतर तुम्ही उत्तम मॉडेल असायला लागता. किंवा तुम्ही अभिनेत्री म्हणून तुमचं नाव कमावणं महत्वाचं असतं. पण असा दुग्धशर्करा योग अभिनेत्री मिथिला पालकरच्या नशिबी आला आहे.
मिथिला पालकर हे नाव ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवं नाही. मराठी रसिकांना तर नाहीच नाही. कारण मिथिलाने अनेक मराठी सिनेमांत कामं केली आहेत. मुरांबा हा त्यातला एक महत्वाचा सिनेमा. तर ओटीटीवर तिने लिटल थिंग्ज ही चांगली वेबसीरीजही केली. तिच्या कामाची दखल घेऊन तिला इतर अनेक ओटीटीवरच्या वेबसीरीज मिळाल्या. ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा नवा चेहरा म्हणून तिला आता व्होग या मासिकाने मुखपृष्ठावर स्थान दिलं आहे. मिथिलानेही या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्म हळूहळू लोकप्रिय होताना दिसत आहेतच. पण सोबत लॉकडाऊनमध्ये या ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सुगीचे दिवस आले. अनेक लोकांचा मोबाईल डेटा खर्च होऊ लागला. कारण लोकांनी नेटफ्लिक्स, झी, प्राईम व्हिडीओज, हॉटस्टार असे अनेक प्लॅटफॉर्म्स बघायला सुरूवात केली. एकूणच ओटीटीवरचा नवा चेहरा म्हणून मिथिलाला ही मुखपृष्ठावर स्थान देण्यात आलं आहे.
मिथिला याबद्दल बोलताना म्हणते, ओटीटी हा फार सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे. कारण, इथे देशांच्या मर्यादा नाहीत. इथे कुणीही काहीही कधीही बघू शकतो. त्यामुळे आपण आपल्या कामातून जगभरात पोचतो. शिवाय, जगभरातले सबस्क्राईबर्स ते पाहू शकतात. यापेक्षा दुसरी आनंदाची बाब काय असेल.
गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी चेहरे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसू लागले आहेत. यात मिथिला पालकर, अमेय वाघ, अमृता सुभाष, आदिती पोहनकर यांचा समावेश होतो. खूप नवनव्या वेबसीरीजमधून नवे चेहरे येतायत असं असताना व्होग इंडिया या अग्रगण्य मासिकाने मिथिलाला आपल्या मुखपृष्ठावर स्थान देणं हे मराठीसह एकूणच ओटीटी जगतासाठी अभिमानाची गोष्ट मानली जाते.