(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'ब्लॅक विडो' स्टार स्कारलेट जॉनसन आणि कॉमेडियन कोलिन जोस्ट अडकले विवाहबंधनात
निवडक लोकांच्या उपस्थितीत आणि अत्यंत साध्या पध्दतीने यांचा विवाहसोहळा पार पडला. स्कारलेट जॉनसन तिच्या आगामी 'ब्लॅक विडो' या चित्रपटात दिसणार आहे
न्यूयॉर्क: हॉलिवूड स्टार स्कारलेट जॉनसनने कॉमेडियन कोलिन जोस्टशी एका खाजगी कार्यक्रमात साध्या पध्दतीने लग्न केले आहे. निवडक लोकांच्या उपस्थितीत आणि कोविड 19 चे सर्व् नियम पाळून हा विवाह सोहळा पार पडला.
स्कारलेट जॉनसन (35) आणि कोलिन जोस्ट (38) यांनी केवळ साध्याच पध्दतीने लग्न केले नाही तर त्यांच्या चाहत्यांना 'मिल्स ऑन व्हिल्स अमेरिका' या चॅरटीसाठी दानही करण्याचे आवाहन केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उपाशी लोकांना अन्न पुरवण्याचा हा कार्यक्रम आहे.
मिल्स ऑन व्हिल्स अमेरिकाने त्यांच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर याबाबत माहिती देताना सांगितले की, "स्कारलेट जॉनसन आणि कोलिन जोस्ट हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि निवडक मित्रपरिवाराच्या साक्षीने कोविड 19 च्या सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून अत्यंत साध्या पध्दतीने विवाह बंधनात अडकले आहेत.'
We’re thrilled to break the news that Scarlett Johansson and Colin Jost were married over the weekend! Their wedding wish is to help make a difference for #MealsOnWheels. You can donate here to celebrate the happy couple: https://t.co/JgM2Xxtm2H https://t.co/cuqI3Zj1Ow
— Meals on Wheels (@_MealsOnWheels) October 29, 2020
कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर गरजू लोकांना काहीतरी वेगळ्या पध्दतीने मदत करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी या जोडीच्या फॅन्सनी मिल्स ऑन व्हिल्स अमेरिका या कार्यक्रमासाठी दान करावे असेही आवाहन त्यांनी इन्स्टाग्रामच्या पेजवरुन केले. स्कारलेट जॉनसनच्या प्रतिनिधींनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कॉमे़डियन कोलिन जोस्ट हा 'सॅटरडे नाईट लाईव्ह' या शोसाठी लेखन आणि निवेदन करतो. तो आणि स्कारलेट जॉनसन गेली तीन वर्षे डेटिंग करतात आणि मे 2019 साली त्यांचा साखरपुडाही पार पडला होता.
कोलिन जोस्टचे हे पहिलेच लग्न आहे तर स्कारलेट जॉनसनचे हे तिसरे लग्न आहे. या आधी तिचे रायन रेनॉल्ड आणि उद्योगपती रोमन ड्युरीक यांच्याशी लग्न झाले होते. तिला एक मुलगीही आहे.
स्कारलेट जॉनसन ही हॉलीवूडच्या सर्वात महागड्या अभिनेत्रीपैकी एक आहे. स्कारलेट जॉनसन तिच्या आगामी ब्लॅक विडो या चित्रपटात दिसणार आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता हा चित्रपट मे 2021 साली प्रदर्शित होणार आहे. स्कारलेट जॉनसनला या वर्षी 'जोजो रॅबिट' आणि 'मॅरेज स्टोरी' या दोन चित्रपटांसाठी ऑस्करचे नामांकन मिळाले आहे. तर दुसरीकडे कोलिन जोस्टने या जुलैमध्ये त्याचे 'ए व्हेरी पंचेबल फेस' हे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे.