NPS Scheme : निवृत्तीनंतर दरमहा 50 हजार रुपये पेन्शन मिळवायचीय? दररोज फक्त 'एवढी' रक्कम जमा करा आणि टेन्शन फ्री व्हा
National Pension System Benefits : निवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला 50 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. ते नेमकं कसं ते जाणून घ्या.
Income After Retirement : अनेकांना निवृत्तीनंतर (Retirement) पुढे काय असा प्रश्न सतावतो. निवृत्तीनंतर खर्च भागवण्यासाठी काय करावं, याचा विचार अनेक जण करत असतात. निवृत्तीनंतर पैशांची अडचण (Income Plan After Retirement) कशी दूर करायची ही चिंता प्रत्येकालाच भेडसावते. पण, तुम्हाला निवृत्तीनंतर चांगली पेन्शन मिळू शकते. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS-National Pension System) ही भविष्यासाठी एक मोठी गुंतवणूक करण्यासाठी आणि निवृत्तीनंतर पेन्शन मिळवण्यासाठी एक उत्तम योजना आहे. यामध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) मध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला 50 हजार रुपये पेन्शन मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला दररोज फक्त 200 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ते नेमकं कसं ते जाणून घ्या.
निवृत्तीनंतर दरमहा 50 हजार रुपये पेन्शन मिळवायचीय?
कामाच्या वयात NPS मध्ये नियमित गुंतवणूक केल्यास 60 वर्षांनंतर, जमा केलेल्या रकमेतील काही भाग काढता येतो आणि उर्वरित रकमेतून नियमित पेन्शन मिळू शकते. NPS मध्ये गुंतवणूक केल्यास कलम 80C अंतर्गत लाभ मिळतो, ज्याची मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम "EEE" श्रेणी अंतर्गत येते. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर लाभ मिळतात. तसेच, रिटर्न आणि मॅच्युरिटी रक्कम देखील पूर्णपणे करमुक्त आहे.
NPS मध्ये 40 टक्के ॲन्युइटी घेणं आवश्यक आहे. नवीन नियमांनुसार, कोणतीही व्यक्ती मॅच्युरिटीनंतर संपूर्ण रक्कम काढू शकत नाही. 40 टक्के निधीसह ॲन्युइटी खरेदी करणे आवश्यक आहे. या ॲन्युइटीतून निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते. उर्वरित 60 टक्के निधी एकरकमी काढता येतो. एखादी व्यक्ती 40 टक्के फंडातून ॲन्युइटी देखील खरेदी करू शकते. ॲन्युइटी जितकी जास्त असेल तितकी मासिक पेन्शन जास्त असेल.
ॲन्युइटी म्हणजे काय?
ॲन्युइटी हे एक विमा उत्पादन आहे, ज्यामध्ये तुम्ही आणि विमा कंपनी यांच्यात एक प्रकारचा करार असतो. यामध्ये व्यक्तीला एकरकमी गुंतवणूक करावी लागते. भविष्यात, तुम्हाला मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक मोबदल्यात पैसे दिले जातात. निवृत्ती पोर्टफोलिओचा भाग म्हणून वार्षिकी वापरल्या जातात. यामध्ये, जोपर्यंत तुम्ही जगता तोपर्यंत तुम्हाला निश्चित उत्पन्न मिळते. तुमच्या मृत्यूनंतर नॉमिनीला रक्कम मिळण्याचा अधिकार आहे.
समीकरण जाणून घ्या
50 हजार रुपयांची मासिक पेन्शन मिळवण्यासाठी 40 टक्के वार्षिकी खरेदी करण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा NPS निधी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही वयाच्या 24 व्या वर्षी NPS खाते उघडलं आणि निवृत्तीपर्यंत दर दिवसाला 200 रुपये म्हणजे दरमहा 6,000 रुपये गुंतवले तर वयाच्या 60 व्या वर्षी तुमच्याकडे 2.5 कोटी रुपयांचा निधी असेल. यासाठी वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत तुम्हाला नियमितपणे NPS मध्ये पैसे जमा करावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही यामध्ये 36 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास तुमच्याकडे 2,55,2000 रुपये निधी जमा होईल. NPS मध्ये जमा केलेल्या रकमेवर 10 टक्के परतावा गृहीत धरल्यास त्याचे एकूण कॉर्पस मूल्य 2,54,50,906 रुपये होईल.
दरमहा 50 हजार पेन्शन कशी मिळेल?
तुम्ही 60 वर्षांपर्यंत पैसे जमा केल्यानंतर 40 टक्के ॲन्यइटी खरेदी करु शकता. ही रक्कम 1,01,80,362 रुपये होईल. म्हणजे तुमचा एवढा निधी खर्च होईल. यावर तुम्हाला कमीत-कमी सहा लाख रुपये व्याज मिळेल. त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला 50,000 रुपये पेन्शन मिळू शकते.