Ladki Bahin Yojana : दीड लाख लाडक्या बहिणींची योजनेतून स्वत:हून माघार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी संख्या घटली
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची यादीची छाननी सुरु करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात.

मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये वर्ग केले जातात. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा करण्यात आले आहेत. महिला व बाल विकास विभागानं परिवहन विभाग, संजय गांधी निराधार योजनेचं रेकॉर्ड आणि कृषी विभागाच्या मदतीनं छाननी सुरु केलेली आहे. निकषात न बसणाऱ्या काही महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर काही लाभार्थी महिलांनी या योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज केले आहेत. या लाभार्थी महिलांची संख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे.
किती लाडक्या बहिणींनी स्वत: लाभ नाकारला?
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जानेवारी महिन्यात डिसेंबर महिन्याच्या तुलनेत 5 लाखांनी कमी झाली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असं म्हणत योजनेतून बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या दीड लाख आहे. या महिला घरातील सदस्यांच्या किंवा संबंधित महिलेच्या नावावर चार चाकी वाहन असणं, नमोशक्ती योजनेचं लाभार्थी असणं अशी इतर कारणं आहेत. याशिवाय 2.30 लाख महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिलांची नावं देखील कमी झाली. 1 लाख 10 हजार महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा अधिक झाल्यानं त्यांची नावं वगळण्यात आली आहेत.
सरकार अपात्र बहिणींकडून पैसे परत घेणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. हे महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे. ज्या अपात्र महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत ते परत घेतले जाणार नाहीत. मात्र, यापुढं त्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जाणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं. राज्य सरकारनं अपात्र बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, असा निर्णय जाहीर केल्यानंतर आणखी काही महिला लाभ स्वत:हून सोडू शकतात.
दरम्यान, महिलांना आर्थिक रित्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 या वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलाना सन्मान निधी प्रदान करण्यात येतो.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
