Hyundai IPO : सर्वात मोठ्या आयपीओला कसा प्रतिसाद? आकडेवारी समोर; ह्युंदाईच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी
Hyundai IPO : भारतातील कार निर्मिती क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी असलेल्या ह्युंदाई यांचा आयपीओ खुला झाला आहे. या आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.
मुंबई : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ 15 ऑक्टोबरला खुला झाला आहे. या आयपीओत गुंतवणूक करण्यासाठी आज शेवटची संधी आहे. ह्युंदाईचा आयपीओ 27870 कोटी रुपयांचा आहे. पहिल्या दोन दिवसांमध्ये या आयपीओमध्ये 0.42 टक्के गुंतवणूक झाली आहे. यामध्ये रिटेल गुंतवणूकदारांनी 38 टक्के गुंतवणूक केलेली आहे. ह्युंदाईचा आयपीओ देशातील सर्वात मोठा आयपीओ असल्यानं गुंतवणूकदार याला कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पहिल्या दोन दिवसांमध्ये हा आयपीओ 42 टक्के सबस्क्राईब झाला आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी यामधील 4.94 कोटी शेअर्सचा कोटा निश्चित करण्यात आला होता. त्यापैकी 1.89 कोटी शेअर्ससाठी बोली लागली आहे.
ह्युंदाईच्या आयपीओसाठी दुसऱ्या दिवशी 4.17 कोटी बोली लागल्या आहेत. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी ह्युंदाईच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या आयपीओला दमदार प्रतिसाद दिला आहे. कर्मचाऱ्यांनी 131 टक्के आयपीओसाठी बोली लावल्या आहेत.
गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 2.12 कोटी शेअर्स निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी 54.93 लाख शेअर्स साठी अर्ज आले आहेत. या विभागातून आयपीओसाठी 26 टक्के बोली लागल्या आहेत.
संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 2.82 कोटी शेअर्सचा कोटा निश्चित करण्यात आला होता. त्यापैकी 1.63 कोटी शेअर्ससाठी बोली लागली आहे. म्हणजे संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून आयपीओमध्ये 58 टक्के गुंतवणूक करण्यात आली आहे.
ह्युंदाईच्या आयपीओत गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ह्युंदाईकडून शेअर्सची किंमत 1865 ते 1960 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आली होती. तर, दर्शनी मूल्य 10 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. ह्युंदाईच्या आयपीओला पहिल्या दोन दिवसांमध्ये समाधानकारक प्रतिसाद मिळाला आहे. आयपीआद्वारे 14.21 कोटी शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेल अंतर्गत केली जाणार आहे.
आज किती गुंतवणूक होणार?
ह्युंदाईचा आयपीओ भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ आहे. यापूर्वी एलआयसीचा आयपीओ आला होता. भारतातील सर्वात मोठ्या आयपीओंमधून गुंतवणूकदारांना मिळालेल्या रिटर्न्सचा विचार करता मोठ्या आयपीओतून गुंतवणूकदारांना फार काही हाती लागलं नसल्याचं चित्र आहे. त्यामुळं इतर आयपीओंच्या तुलनेत ह्युंदाईच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार सावधपणे पावलं टाकताना पाहायला मिळतात.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)