Gold : भारतात सोन्याची तस्करी वाढली, चोरीचे तब्बल 2000 किलो सोने जप्त
भारतात सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशात चोरीचे तब्बल 2000 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
Gold : भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने आयातदारांपैकी एक आहे. पारंपारिकपणे, भारतात सोने ही सुरक्षित गुंतवणूक पद्धत मानली जाते. सणासुदीच्या काळात किंवा लग्नसमारंभात ते खरेदी करून भेट म्हणून देणे शुभ मानले जाते. अलीकडे सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. अशातच भारतात सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशात चोरीचे तब्बल 2000 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
2022 मध्ये भारताने 35 अब्ज डॉलरचे सोने आयात केले होते. भारतीय चलनात ही किंमत 2,91,060 कोटी रुपये आहे. कच्च्या तेलानंतर (पेट्रोलियम) भारताचे सर्वाधिक आयात बिल सोन्याचे आहे. सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारने 'सार्वभौम सुवर्ण रोखे' सारखी योजनाही आणली आहे, पण परिस्थिती अशी आहे की मागणी पूर्ण करण्यासाठी देशात सोन्याची तस्करीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
चोरीतून 2000 किलो सोने जप्त
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर 2023) देशात सोन्याची तस्करी वाढली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, यावर्षी 2000 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच काळात पकडण्यात आलेल्या तस्करीच्या सोन्याच्या तुलनेत हे प्रमाण 43 टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी एप्रिल-सप्टेंबरमध्ये 1 हजार 400 किलो सोने जप्त करण्यात आले होते. तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सरकारने सुमारे 3 हजार 800 किलो सोने जप्त केले होते. संजय कुमार अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, यंदा सोन्यावरील कर आणि शुल्कात कोणताही फरक पडलेला नाही. अगदी गेल्या वर्षीप्रमाणेच या तस्करीचे कारण जागतिक आणि स्थानिक पातळीवर सोन्याच्या वाढत्या किंमती असू शकते.
देशात म्यानमार, नेपाळ आणि बांग्लादेशच्या सीमेवरून सोन्याची तस्करी
2000 किलो चोरीचे सोने भारतात पोहोचले हे बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारसारख्या देशांच्या अधिकाऱ्यांच्याही लक्षात आले नाही. याबाबत संजय कुमार अग्रवाल म्हणाले की, भारतात सोन्याची तस्करी प्रामुख्याने म्यानमार, नेपाळ आणि बांग्लादेशच्या सीमेवरून होते. DRI च्या 2021-22 च्या अहवालानुसार, भारतात सोन्याची तस्करी सोन्याच्या आयातीवर लादण्यात येणारे शुल्क आणि सोन्याच्या मागणीवर अवलंबून असते. सध्या देशात सोन्यावर 12.5 टक्के कस्टम ड्युटी आहे. त्याच्या आयातीवर 2.5 टक्के दराने कृषी उपकर आणि 3 टक्के IGST आकारला जातो. अशा प्रकारे सोन्याच्या आयातीवर एकूण 18.45 टक्के कर आहे. त्याचवेळी, किरकोळ विक्री ग्राहकांना इतर कर भरावे लागतात.
महत्त्वाच्या बातम्या:
Gold Silver Rate: सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीनं दिला धक्का, दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या महत्वाच्या शहरातील दर