BLOG: अजून खूप प्रवास बाकी आहे!
समोरचे दृश्य खूप मोहक आहे,
म्हणून इथे रेंगाळावेसे वाटते आहे,
मात्र मी नियतीला वचन दिले आहे,
अजून खूप प्रवास बाकी आहे
खूप प्रवास बाकी आहे !"
भारत जोडो यात्रेतील यात्रेकरूंना बघितल्यावर रॉबर्ट फॉर्स्ट यांची ही कविता आठवते. या कवितेचा अजून संदर्भ सुद्धा आहे. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या टेबलवर ही कविता लिहिलेली होती. 4 राज्ये 1182 किमीचे अंतर पादाक्रांत करून काल भारत जोडो यात्रेने तेलंगणामध्ये प्रवेश केला. तेलंगणावासियांनी यात्रेचे केलेले स्वागत अभूतपूर्व होते. आता यात्रेत सहभागी असलेल्या यात्रेकरूंना आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करता यावी यासाठी यात्रा 3 दिवसांसाठी तेलंगणामध्ये विसावली.
कर्नाटकमध्ये यात्रा तब्बल 24 दिवस होती, 500 च्या आसपास अंतर यात्रेने कापले. कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने लोकं स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन यात्रेला पाठिंबा देत होते हे पाहून यात्रा खऱ्या अर्थाने कर्नाटक मध्ये बहरली असे जाणवले. राहुल गांधी सुद्धा यात्रेत समरस होऊन पुढे चालत आहे. विविधांगी असलेल्या महाकाय देशातील संस्कृतीशी, तिथल्या लोकांशी एकरूप होताना दिसत आहे.
यात्रेचे खरे यश म्हणजे लोकांना ही यात्रा आपलीशी वाटत आहे. यात्रा आपल्या गावातून जात आहे या आनंदात तेथील लोकं असल्याचे चालताना जाणवत होते. एक आज्जी आपल्या गावातून यात्रा जाते आहे पण तिला राहुल गांधींना काय द्यावे असा प्रश्न पडतो तेव्हा ती तिच्या शेतातील आलेल्या काकड्या भेट देते. हे शेत मला इंदिरा गांधींच्या भूमी सुधार कायद्यामुळे मिळाले ही कृतज्ञता दाखवते. यापुढे भारत जोडो यात्रा काढल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी भारतीय सैन्यातील माजी अधिकारी यात्रेत सोबत चालतात यावरून आपण ही यात्रा व्यापक झाली आहे हे समजू शकतो. भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाचा कणा असलेल्या आशा वर्कर्स सोबत यात्रेच्या मधल्या वेळेत राहुल गांधी आणि त्यांची टीम संवाद साधते. त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी,समस्या जाणून घेतल्या. अत्यंत तुटपुंज्या पगारवर काम करणाऱ्या आशा सेविकांचा एक प्रकारे सन्मानच केला आहे. वाटेत जात असताना एक कुटुंब त्यांच्या घरावर उभे राहुन यात्रेची वाट पाहत होते असल्याचे राहुल गांधींच्या निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी वाट वाकडी करत त्यांच्या घरी गेले. त्या कुटुंबाचा आनंदाला पारावर उरला नाही.
आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक शेती आहे. गेल्या काही वर्षात निसर्गाच्या असमतोलामुळे शेतीला मोठा फटका बसत आला आहे. यात्रा जेव्हा शेतीच्या वेशीवरून जात होती तेव्हा राहुल गांधींनी शेती उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली. त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सततच्या नापिकीमुळे आम्ही कर्जबाजारी होत चाललो असल्याचे त्यांचे म्हणणे होते. अतिशय पोटतिडकीने राहुल गांधी त्यांच्याशी संवाद साधत होते.8 दिवसांपूर्वी राहुल गांधींच्या खांद्यावर बसलेल्या चिमूकलीचा फोटो समाजमाध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल झाला. तिच्या डोळ्यात असलेली निरागसता फोटोग्राफरने खुबीने हेरली होती.कृष्णा नदीवर असलेल्या पुलावरून जेव्हा यात्रा जात होती तेव्हा पूर्ण पुलावर माणसेच माणसे दिसत होती. जसे की माणसाच्या जथ्याने कृष्णा माई दुधडी भरून वाहत होती. हे विहंगम दृश्य खुबीने कैद करण्यात आलं. डोळे दिपवणारे दृश्य होते.
यात्रेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यांना आपल्या न्याय्य मागण्याबद्दल बोलायचं होतं, पण त्यांचे कुणी ऐकून घेत नव्हते असे लोकं पुढे येऊन राहुल गांधींशी बिनदिक्कतपणे बोलत आहेत, यात्रेशी जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पक्ष म्हणून कॉंग्रेसला याचा फायदा होईल की नाही हा आता अंदाज बांधू शकत नाही. पण लोकांना यात्रेतून आशेचा किरण दिसत आहे ही सकारात्मक सातत्याने जाणवत आहे. यात्रा आता तेलंगणामधून पुन्हा सुरू होईल आणि पुढच्या महिन्यात महाराष्ट्रात प्रवेश करेल. महाराष्ट्र भारताच्या नकाशात मध्यभागात येते. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा दुवा म्हणून आपल्या राज्याकडे पाहिले जाते. यात्रेत महाराष्ट्राचा खरा कस लागणार आहे, लोकं यात्रेला कसा प्रतिसाद देतात यावर पुढील यात्रेची दिशा ठरणार हे मात्र नक्की...
वैभव कोकाट यांचे अन्य ब्लॉग