BLOG: भारत जोडो यात्रा डायरी, थेट केरळमधून
राहुल गांधींनी सुरु केलेल्या 'भारत जोडो पदयात्रेत' काही दिवस सहभागी झाल्यानंतर काही लिहावे वाटले. एखाद्या राजकीय नेत्याने एवढ्या अंतराची पदयात्रा जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ असावी. याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातून केरळला निघालो. हा आमचा प्रवास कसा होता याबद्दल न सांगितलेले बरे, आम्ही केरळ-तामिळनाडू सीमेवरच्या 'परस्साला' या गावी पोहचलो, तेव्हा पदयात्रा सुरु होऊन 3 दिवस झालेले.
राहुल गांधींचा मुक्काम या गावातील एका शाळेत होता. तिथे जायला आम्हाला रात्रीचे 8 झालेले. राहुल गांधी अन् त्यांच्यासोबतचे लोकं शाळेत पोहचलेले. सामान्य लोकांना आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. महाराष्ट्रातून राहुल गांधीसोबत चालणारे काही 'भारत यात्री' होते. त्यांचा नंबर शोधून आम्ही त्यांना संपर्क केला तर ते म्हणाले कि तुम्ही उद्या सकाळी शार्प 7 वाजण्याआधी इकडे या, इथून आम्ही पुढे निघू. शाळेत यात्रेकरूसाठी मसाले भात केलेला, त्यावर ताव मारून आम्ही थिरुअनंतपूरमला हॉटेलवर मुक्कामाला निघालो. केरळात तरी राहुल यांच्या सोबत चालणाऱ्या सगळ्यांची राहण्याची सोय केलेली नव्हती. जेवणाची होती. फक्त राहुल गांधींसोबत कायम चालणाऱ्या 120 भारत यात्री यांची कंटेनरमध्ये व्यवस्था केलेली आहे.
जर तुम्हाला पदयात्रेत जायचे असेल तर तुम्हाला राहण्यासाठी हॉटेल पाहावे लागेल. आम्ही हॉटेलवर पोहचलो. आराम केला. परस्सला ते थिरुअनंतपूरम अंतर तसे 40-45 KM पण जायला तास दीड तास लागतो. आम्ही पहाटे 4 वाजता उठलोत, सगळे आवरून सकाळी शार्प 7 च्या आधी 'परस्सला' गावातील शाळेजवळ पोहचलो. तर राहुल गांधी यांनी तिथे ध्वजारोहण केलेले. गावातील एका चौकात कामराज यांचा पुतळा होता. तिथे राहुल गांधी आले. त्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला अन पदयात्रेला सुरवात केली. राहुल सोबत स्थानिक अन इतर राज्यातून आलेले 4-5 हजार लोकं सोबत चालतात. राहुल यांच्या भोवती दोन्ही बाजूने 50-50 केरळ पोलीस यांचे कडे केलेले होते, त्यामध्ये काही बंदूकधारी जवान होते. अन् काळ्या पोशाखातील बॉडीगार्ड वेगळे होते. मला सुरवातीला सेक्युरिटीचा अतिपणा वाटू लागला पण नंतर विचार केला कि हजारो चांगली लोकं असतील पण एखादा माथेफिरू निघाला तर ? परिवाराचा इतिहास डोळ्यासमोर आला. जे आहे ते योग्य आहे म्हटलं. राहुल सोबत तेथील स्थानिक नेते चालायला सुरु झाले.
राहुल जसे चालायला सुरु झाले तसे रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केलेली. केरळात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शिस्तबद्ध रांगेत नागरिक थांबलेले दिसले हे खूपच छान वाटले, संपूर्ण भारतात ही यात्रा जिथे जिथे जाईल तिथे तिथे सर्वांनीच याचे अनुकरण करावे असे आवर्जून सुचवावेसे वाटते. घरातील सगळे सदस्य सकाळी आहे तश्या अवस्थेत दारावर येऊन उभे राहत. केरळात घरे हि रस्त्याच्या आजूबाजूनेच आहेत हे सांगणे इथे गरजेचे, कोणी हातात फुले घेऊन थांबत होते तर कोणी पाणी, किंवा बिस्कीट, राहुल गांधी सर्वांना अभिवादन करत पुढे चालत होता. कोणी राहुल गांधींकडे येऊ लागले अन सेक्युरीटिने त्यांना अडवले तर राहुल गांधी स्वतः त्यांना जवळ बोलवायचे, प्रेमाने जवळ घ्यायचे. मग त्यात अबालवृद्ध सगळे आले.सगळ्यांना राहुल सोबत चालावे वाटायचे पण सगळ्यांना ते शक्य नाही, त्यामुळे राहुलला पाहून अनेक जण आनंदी व्हायचे. असा राहुलचा प्रवास चालू असायचा.
राहुल हे प्रचंड फिट आहेत, त्यांच्या बरोबरीने चालणे होत नाही. काही लोकं खूप मागे राहतात. सकाळी 7 ला सुरु झालेला हा प्रवास 11 वाजता एखाद्या शाळेजवळ, सभागृहाजवळ थांबतो. तिथे नियोजित लोकांना बोलावले जाते. मग ते शहरातील विविध ग्रुप, मुले, किंवा मजूर वर्ग, वेगवेगळ्या वर्गाच्या ठराविक प्रतिनिधींना बोलावले जाते. त्यांच्या सोबत राहुल यांचे हितगुज होते. राहुल त्यांचे सर्व ऐकून घेतात. दुसरीकडे सोबत असलेले जयराम रमेश हे प्रेस घेतात. दुपारचे जेवण इथे होते. 4 वाजेपर्यंत थोडा आराम केला जातो. 4 ला यात्रा पुन्हा सुरु होते अन 7 ला मुक्काम ठिकाणी पोहचते. तिथे गेल्यावर सभा वैगेरे होत नाही. सभा फक्त ठरलेल्या काही शहरात, ते शहर यायला कधी कधी आठवडा जातो. मग राहुल हे एकदा मुक्काम ठिकाणी गेल्यावर दुसऱ्या दिवशी 7 वाजताच जनतेपुढे येतात. असा त्यांचा प्रवास आठवडा झालं सुरु आहे.
या यात्रेत मी अनेकांना भेटलो, त्यांच्या भावना जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तर अनेकांना असं वाटायचं कि भाजपच्या अजस्त्र यंत्रणेविरोधात रस्त्यावर उभा राहणारा शेवटचा नेता हा राहुल गांधी आहे, तो आमच्या इथे येतोय तर आम्ही पण त्याच्या पाठी मागे उभे राहिले पाहिजे. एक वयोवृद्ध गृहस्थ मला यात्रेत चालताना दिसले, यात्रेत ते फार मागे होते. त्यांना म्हटलं बाबा, चालयाला येईना तुम्हाला घरी बसायचं सोडून कशाला यात्रेत निघाले ? तर ते मला म्हटले कि मी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी केली. पोरं शिकवली, ती पण चांगल्या नोकरीला आहेत, घरदार सगळं व्यवस्थित आहे. मी या मुलाच्या (राहुलच्या) वडिलांना, आज्जीला पाहिलेय. रेडिओवरून त्यांच्या बातम्या ऐकल्यात. नोकरीवर होतो म्हणून सक्रिय त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही. आज रिटायर आहे,घरी बसून असतो. त्यामुळे आज याच्यासोबत(राहुल) उभा राहायचे नाही तर काय करायचे ? माझ्या आयुष्याचे साध्य मी साधलं आहे. आता या यात्रेत जर मला मरण आले तर मी स्वतःला भाग्यवान समजेल. त्या बाबांच्या तोंडून असं ऐकल्यावर आपण यात्रेला आलोत याचे मनाला हायसे वाटले. पुढे जाताना मला काही मुले राजस्थानवरून आलेली दिसली. चपलेवर होती. मिळेल त्या ट्रेन ने प्रवास करून आलेली. छत्तीसगडवरून 27 वर्षाची मुलगी पार्वती शाहू जिचे नाव ती एकटीच यात्रेत चालत होती. तिच्या पाठीवर भली मोठी बॅग, तिला विचारलं तर म्हटली कि मी ठरवलं या यात्रेत मला चालायचे आहे. बॅग उचलली अन एकटीच कन्याकुमारीला निघून आली. माझ्या अनुभवानुसार तिथे भेटलेली सगळी लोकं एकमेकांना समजून घेण्यात अन मदत करण्यात फार पुढे होती. भाषेची बंधने येत असताना हि, असंच एका तामिळ आजोबांशी मोडक्या इंग्रजीत बोलताना त्यांनी मला त्यांच्या मनातील एक भीती बोलवून दाखवली. त्यांचे असं म्हणणे होते कि आमची मुले विदेशात, आखाती देशात गेली, आमच्या नातवांना हिंदी बोलता येतेय पण तामिळ येत नाही. हिंदीचे आमच्यावर बंधने आपोआप पडतील अशी भीती त्यांच्या मनात होती. मी त्यांना सांगितलं कि हा जो भारत आहे तो महाराष्ट्राच्या खालच्या राज्यांनी एकसंध ठेवला आहे. पण ते मनातल्या मनात चिंतीत होते. केरळातील लोकांना तर राहुलला पाहून प्रचंड आनंद होतो, काहींच्या डोळ्यात तर अश्रू तरळतात. तामिळनाडू मधले काही जण यात्रेत होते. ते तर जणू राहुलच्या वडिलांसोबत झालेल्या घटनेचे प्रायश्चित आम्ही चालून घेत आहोत अशाच भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवत होत्या. अशा अनेक कथा तिथे तुम्हाला पाहायला भेटतात.
मला जाणवलेल्या काही गोष्टी अशा कि यात्रेत राहुल गांधी यांनी रोज मुक्कामी असतील तेवढ्या लोकांना संबोधित करावे. दुसरे असे कि शक्य असेल तर त्यांनी सामान्य लोकांना अजून जवळ घ्यावे अन सोबत चालावे. साध्या पोशाखात पोलीसवाले सोबत घेऊ शकले तर अजून उत्तम, ठराविक शहरात ते भाषण होते त्यात राहुल गांधी हे स्थानिकांचे विषय अन् समस्या मांडत नाहीत. जर त्या मांडता आल्या तर तेथील लोकांशी आणखी जवळीक होईल. यात्रेचा उद्देश फक्त एकता निर्माण करणे आहे. त्यामुळे ते थेट कोणत्या विषयावर हल्ला चढवत नाहीयेत, फक्त काही वेळा महागाई, अन काँग्रेसच्या न्याय योजनेवर यावर बोलत आहेत. ते अजून जास्त ठामपणे आणि परत परत बोलले पाहिजे. महागाई अन बेरोजगारी हा मुद्दा जास्त हायलाईट व्हावा. यात्रेचा टेम्पो एवढ्या दिवस टिकवून ठेवणे सोप्पी गोष्ट नाही. यासाठी त्यांच्या टीमला बरीच मेहनत घ्यावी लागेल. बाकी त्यांच्या चालण्याला सलाम केले पाहिजे, ते का ? हे आम्ही 2 दिवस सोबत चालल्यावर आम्हाला समजलं. पुन्हा नंतर दुसऱ्या राज्यात या यात्रेला परत जॉईन होऊ, यात्रेला शुभेच्छा देत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो.
- वैभव कोकाट, थिरुअनंतपूरम- केरळ
(लेखक हे सोशल मीडिया अभ्यासक आणि मुक्त लेखक आहेत.)
टीप- लेखात दिलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. याच्याशी एबीपी माझा सहमत असेलच असे नाही.