एक्स्प्लोर

BLOG : जालना नावाच्या सोन्याच्या पाळण्याला सांस्कृतिक गंज

BLOG : तेवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे...
स्थळः नाट्यशास्त्र विभाग, डॉ. बा. आं. म. विद्यापीठ, औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर).
प्रसंग : प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती.
"जालन्यात (Jalna) एक नाट्यगृह आहे. त्याचे नाव तुला माहीत आहे का?" प्रा. कुमार देशमुख सरांनी मला विचारले. मी म्हणालो, "होय, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह." लगेच सरांनी विचारले, "कोण होते ते?" (मी मनात म्हणालो, "आपल्या गावच्या माणसाबद्दल सांगण्याची ही संधी कोण सोडेल?") मग पद्मभूषण मास्टर कृष्णराव हे नट आणि संगीतकार म्हणून किती मोठे होते याचे अनेक दाखले मी दिले. बालगंधर्वांसोबत त्यांनी संगीत नाटकांत मुख्य भूमिका केल्या. माणूस, शेजारी, कीचकवध यासह 19 चित्रपटांचे संगीतकार, वंदे मातरम् गीताला वेगवेगळ्या चाली लावून थेट पं. नेहरूंपर्यंत पाठपुरावा करणारे मास्टर कृष्णराव, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विनंतीवरून पाली भाषा शिकून संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक छंदामध्ये बसवणारे मास्टर कृष्णराव, धुंद मधुमती रात रे, नाथ रे... या गाण्याचे संगीतही त्यांचेच...अशी माहिती सांगितल्यानंतर नाट्यशास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी माझा प्रवेश निश्चित झाला.

माझे मूळ गाव 'बोरगाव अर्ज' हे फुलंब्री तालुक्यात आहे. मास्टर कृष्णरावांचे गाव फुलंब्री असल्याचे आम्हाला आधीच भूषण वाटे. त्यात वडिलांच्या नोकरीनिमित्त 1977 मध्ये आम्ही जालन्यात आलो. तेथे 1982-83 मध्ये मास्टर कृष्णरावांच्या नावाने अत्यंत देखणे आणि सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात आले. येता-जाता हे नाव आणि भव्य नाट्यगृह पाहून आनंद वाटत असे. 

वर्ष 1978. माणिकचंद बोथरा हे दूरदृष्टीचे, सुसंस्कृत नगराध्यक्ष शहराला लाभले. पुढील सहा वर्षांत त्यांनी अनेक प्रकल्प राबवले. त्यातलेच एक होते मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह. मुंबई-पुण्याच्या तज्ज्ञांना बोलावून ते बांधून घेतले होते. या नाट्यगृहाच्या उद्‌घाटनाला साक्षात नटवर्य प्रभाकर पणशीकर, फय्याज ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर आले होते. तेव्हा येथे संगीत सौभद्र, तुझे आहे तुजपाशी, तो मी नव्हेच, रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले वगैरे अशी पाच नाटके या दिग्गज कलावंतांनी सादर केली होती.

'या' नाट्यगृहाने जालन्याला काय दिले?

मराठवाड्यातील हे पहिले अत्याधुनिक नाट्यगृह. इथले अकाउस्टिक्स म्हणजे इमारतीची 'ध्वनिविषयक गुणवत्ता' आजही उत्तम आहे. येथील प्रकाश व ध्वनिव्यवस्था सुरुवातीला उच्च दर्जाची होती. आम्ही लहानपणी जेव्हा येथे नाटक पाहण्यासाठी जात होतो तेव्हा आधी मंद स्वरात पंकज उधास वगैरेंच्या गझला लावल्या जात. प्रेक्षागृहाच्या छताला अप्रत्यक्ष उजेडासाठी दिव्यांच्या तीन रांगा होत्या. त्या दिव्यांना डीमर लावलेले होते. नाटकाची वेळ झाली की दिवे हळूहळू मंद होत विझत आणि स्वयंचलित लाल मखमली पडदा दोन्ही बाजूंना सरकत जात असे. अशा रीतीने नाटकापूर्वीच प्रेक्षकांना ताब्यात घेण्याची किमया हे नाट्यगृह करीत असे.

यापूर्वी जालना शहरात पत्र्याचा आडोसा केलेल्या एका रंगमंचावर नाटके होत असे. पण मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहामुळे जालना शहर व जिल्ह्याला एक वेगळे जागेपण आले होते. शहरात श्रेयस, रंगमंच, मास्क, न्यायश्री, सॅको ग्रुप अशा अनेक नाट्यसंस्था वेगवेगळे प्रयोग करू लागल्या. राज्य नाट्यस्पर्धेचे केंद्र जालन्यात आले. साखर कारखान्याचे बॉयलर पेटावेत तसे दरवर्षी स्पर्धा आली की नाटकवाले पेटून उठत. त्वेषाने तालमी सुरू होत. नवीन नाटके लिहिली जात. जुने गाजलेले नाटक बसवायचे असेल तर ते वेगळ्या पद्धतीने कसे करता येईल यावर चर्चा होत.

अशोकजी लोणकर सरांसारखे जाणते दिग्दर्शक नाटकाच्या विषयामागचे तत्त्वज्ञान सांगत. नाट्यलेखक शंकरराव परचुरे काका आणि कवी किशोर दादा घोरपडे यांचा सर्वच क्षेत्रात संचार असे. अनेक नट रंगमंचावर धुमाकूळ घालत. मिलिंद दुसे, संजय टिकारिया, मुकुंद दुसे, महेंद्र साळवे आपापल्या संस्थांची नाटके उत्साहाने सादर करत. मुरलीधर गोल्हार, गणेश जळगावकर, संजय लकडे, सुनील शर्मा, अमोल कुलकर्णी, विजय सोनवणे आदींनी नट म्हणून तो काळ गाजवला.
 
पुढे सतीश लिंगडे, सुमित शर्मा, रेखा चव्हाण, ओंकार बिनीवाले आदींनी उत्कर्ष थिएटर सुरू केले. सुंदर कुंवरपुरिया यांच्या सहकार्‍यांनी 'नाट्यांकुर' ही बालनाट्य स्पर्धा तर चाळीस वर्षांपासून अखंड सुरू ठेवली आहे. त्यातून अनेक कलाकार पुढे व्यावसायिक नाटक व सिनेमात गेले. (या पूर्वीच्याही काळात प्रभाकरराव देशपांडे, भगवंत दंडे, दत्तोपंत जाफराबादकर आदी जुने रंगकर्मी संगीत नाटक करीत असा इतिहास आहे.)

'कवितेचा पाडवा' हे राज्यभर गाजलेले मोठे कविसंमेलन याच नाट्यगृहात होत असे. व्यावसायिक नाटके येथे येत असत आणि प्रचंड गर्दी करून, तिकिटे काढून जालन्यातले रसिक ही नाटके पहात असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत राज्यभरातील व्याख्याते मेंदू ढवळून काढीत. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत जिल्हाभरातून नाटके येत आणि हे नाट्यगृह दणाणून सोडत. त्यावर दुसर्‍या दिवशीच्या दैनिकात नियमित समीक्षा लिहून येत असे. 

र्‍हासाचा आरंभ...

मास्टर कृष्णराव कोण होते? नाट्यगृहाचे महत्त्व काय? हे सर्व नगर पालिकेतील सर्वपक्षीय ठेकेदार नंतर विसरले. हे नाट्यगृह लग्नासाठी, शरीरसौष्ठव स्पर्धांसाठी आणि कशासाठीही दिले जाऊ लागले. कधी पैसे घेऊन तर कधी मर्जीतल्या लोकांना चक्क फुकट दिले जाऊ लागले. तेथे हुल्लडबाजीला ऊत आला. लावण्यांच्या कार्यक्रमात खुर्च्यांवर उभे राहून तुटेपर्यंत धिंगाणा सुरू झाला. 
तेव्हा नाटकवाल्यांनी, पत्रकारांनी बरेच दिवस आरडाओरड केल्यानंतर 2006 मध्ये नगराध्यक्ष भास्करराव अंबेकरांनी निधी आणून नाट्यगृहाचे नूतनीकरण केले. त्याचे उद्‌घाटन दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. 

नाट्यगृह सुरू झाले. पुढे तीन-चार वर्षांत पुन्हा तोच धिंगाणा नव्या जोमाने सुरू झाला. इथल्या लोकांनाही हे नाट्यगृह आपले वाटत नाही. नुकसान करणार्‍यांना कुणी हटकले तर म्हणतात, "तेरे बाप का है क्या?" येथील मूळ साउंड सिस्टीम गायब झाली ती अजूनही सापडलेली नाही. प्रकाश योजनेचे साहित्य कुणीतरी उचलून नेले. बिलाच्या थकबाकीमुळे मंडळाने वीज कापली. राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र जालन्यातून औरंगाबादला गेले. आता येथे कुणाला नाटक करायचे असेल तर स्वतः जनरेटर भाड्याने आणावे लागते, प्रकाश योजनेसाठी दिवे स्वतःच आणावे आणि लावावे लागतात. माणसे लावून साफसफाई करून घ्यावी लागते. 

उत्कर्ष थिएटरचे सतीश लिंगडे दरवर्षी नवीन नाटक लिहितात आणि कलाकारांसह कामगार कल्याण केंद्रात किंवा मिळेल त्या ठिकाणी तालमी करतात. औरंगाबाद केंद्रावर जाऊन नाटक सादर करतात. तेच नाटक जालन्यात सादर करायचे झाल्यास जेईएस कॉलेजच्या मंचावर करावे लागते. तेथील मंच म्हणजे नाट्यगृह नाही. त्यामुळे तेथे सर्व साहित्य स्वतःच न्यावे लागते. गावाच्या बाहेर हे कॉलेज असूनही रसिक तेथे मोठ्या संख्येने येऊन नाटक पाहतात. मागच्या वेळी नाटकानंतर सतीश लिंगडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी बर्‍यापैकी पैसेही दिले होते. शहरातल्या नाट्यगृहासाठी आंदोलन उभारायला उत्कर्ष थिएटरसह सर्वच कलाकार एका पायावर तयार आहेत. पण क्षणभंगुर किंवा एकदिवसीय आंदोलनाने आता परिवर्तनाची शक्यता नाही.

प्रशांत दामलेंचा डायलॉग...

मला आठवते, 'गेला माधव कुणीकडे' या नाटकाचा प्रयोग मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृहात सुरू होता. प्रयोगादरम्यान प्रशांत दामले यांच्या डोक्यावर छतामधून पावसाच्या पाण्याचा एकेक थेंब पडायचा आणि ते संवाद थांबवून, वैतागून प्रेक्षकांना विचारायचे 'अरे काय आहे हे?' 

आमचा अभिनेता मित्र कैलास वाघमारे नुकताच बरेली शहरात एक शो करून परतला. तो सांगत होता की, तेथे एका कुटुंबाने आपल्या घराच्या वरच एक छोटेसे भारी नाट्यगृह बांधले आहे. तेथे प्रयोग सुरू असताना पाऊस आला आणि एके ठिकाणी थेंब टपकायला लागले. ताबडतोब त्या लोकांनी छतावर जाऊन ताडपत्री अंथरली आणि गळती बंद केली. प्रयोग अखंड सुरू राहिला.

अशी देखभालीसाठी सोपी, छोटी नाट्यगृहे शहरात असतील तर सादरीकरणाच्या कला नक्कीच बहरतील. नटांना रंगमचीय अवकाश कसा वापरावा आणि कसा भारून टाकावा याचा प्रत्यक्ष अनुभव रंगमंचावरच घेता येतो. प्रेक्षक आणि कलावंत यांच्यात ऊर्जेची देवाणघेवाण कशी होते याचाही अनुभव नाटकच देते. आमच्या शहरात नव्याने जन्मलेल्या नागरिकांनी काय गमावले आहे याची त्यांना कल्पना नाही. त्यामुळे त्याचे दुःखही वाटण्याचे कारण नाही.

नाट्यगृहासाठी पथनाट्य...

येथील एक ज्येष्ठ रंगकर्मी आहेत संजय टिकारिया. 'रंगमंच' नावाची संस्था चालवत. त्यांनी सामाजिक समस्यांवर अनेक नाटके लिहून याच मंचावर सादर केली आहेत. पण याच नाट्यगृहाच्या दुर्दशेवर पथनाट्य करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. जालना शहरात अनेक ठिकाणी पथनाट्य करून त्यांच्या चमूने लोकांना जागे करण्याचा प्रयत्न केला. मी तेव्हा दैनिक आनंद नगरीचा संपादक होतो. या दैनिकामध्ये टिकारिया सरांची सडेतोड लेखमाला आम्ही चालवली. नगर पालिकेला निवेदने दिली. तरीही नाट्यगृह दिवसेंदिवस बदतर होत गेले.

2010 मध्ये एके दिवशी मला एक फोन आला, "सांस्कृतिक विभाग, दिल्ली येथून अमृता देशमुख नावाच्या आर्किटेक्ट जालन्यात आल्या आहेत. त्यांना मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृहाची पाहणी करायची आहे." मी तत्काळ शहरातील नाटकवाल्यांना फोन करून थिएटरवर बोलावून घेतले. बाई आल्या. नाट्यगृहाची आतून, बाहेरून पाहणी केली. "याचा जीर्णोद्धार करण्यासाठी दिल्लीला अहवाल पाठवायचा आहे", असे म्हणाल्या. आम्ही नाटकवाल्यांनी मोठ्या आशेने त्यांच्याशी चर्चा केली. बाई गेल्या. पुन्हा त्यांचे पत्र, फोन, मेल काहीही आले नाही. आज त्यांचा फोन लावला तर तोही अस्तित्वात नाही. (हा लेख जर त्या वाचत असतील तर कृपया आम्हाला काही कळवा.)

नाटक माणसाला काय देते?

केवळ खाणे, पिणे, झोपणे आणि सुख ओरबाडणे हे माणसाला एका टप्प्यावर कंटाळा, वीट आणते. अशा वेळी नाटक, साहित्य, कविता त्याला आनंदाचे नवे दार उघडून देतात. साध्या गोष्टीतून जगण्याचे तत्त्वज्ञान मांडणे हीच तर माणसाची खासियत! सुख-दुःखांच्या पलीकडे कलात्मक आनंद आणि वेदनेच्याही अनंत शक्यता नाटक दाखवते. आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात आपली भूमिका वेगळी असते आणि भूमिका ओळखून कसे वागावे हे नाटक शिकवते. नाटक विचार देते. नाटक प्रश्न उपस्थित करते. (म्हणूनच मनोहर जोशींसारख्या नेत्याने 'सखाराम बाइंडर' नाटकाचा फूटलाइट बुटाची लाथ मारून फोडला असावा.)

जालन्यातल्या राज्यकर्त्यांनाही त्यामुळेच नाटक आणि नाट्यगृह नकोसे झालेले असावे. कुठल्याही कार्यक्रमात आमचे नेते आश्वासन देतात की, नाट्यगृहासाठी निधी येणार आहे. लवकरच ते पुन्हा चांगले सुरू होईल. पुढे काहीच होत नाही. खरा प्रश्न असा आहे की, नगर पालिकेच्या अर्थसंकल्पात नाट्यगृहासाठी तरतूदच केली नाही तर त्याची देखभाल होणार कशी? केवळ किरायातून येणारे उत्पन्न त्यासाठी पुरेसे नाही. पालिकेतील विरोधक कोणत्याही पक्षाचे असले तरी ते यावर आक्षेप घेत नाहीत. शहरातील नाटकवाल्यांचा व नागरिकांचा त्यासाठी फारसा दबाव नाही, एकजूटही नाही. 

30 जानेवारी 2017 रोजी तत्कालीन नगराध्यक्षांनी एका कार्यक्रमात आश्वासन दिले होते की, आठ दिवसांत नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू होईल. आज पाच वर्षे उलटली तरी नूतनीकरण सुरू झालेले नाही आणि कलावंतही त्यांना विचारायला गेले नाही.

आमचा मित्र नाट्यलेखक, दिग्दर्शक राजकुमार तांगडे याने 2009 मध्ये याच नाट्यगृहात 'आकडा' या एकांकिकेचा विशेष प्रयोग सादर केला होता. प्रयोग संपल्यानंतर उपस्थित नेत्यांना राजकुमारने सुनावले होते की, "या नाट्यगृहाचे सभागृह करू नका, नाट्यगृहच राहूद्या." लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवून त्याच्या बोलण्याला प्रतिसाद दिला होता आणि मंचावरील नेते कसेबसे हसण्याचा प्रयत्न करत होते.

रंगकर्मी फक्त मिरवण्यासाठी आहेत का?

जालन्यात मराठी माणूस आणि नाटकाचा रसिक अल्पसंख्य झाला आहे, असाही मुद्दा एका ज्येष्ठ पत्रकारांनी उपस्थित केला. नाट्यगृह सुधारले पाहिजे, नाटक नियमित झाले पाहिजे असे वाटणारी माणसे येथे कमी उरली आहेत. हे पक्के व्यापारी शहर झाले आहे. येथे अशी सांस्कृतिक कोंडी होणारच, असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले. ते म्हणतात की, "या नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी पुढार्‍यांनी आणला आणि किरकोळ दुरुस्ती करून बाकीचा पैसा स्वतःच गडप केला आहे. आज हे नाट्यगृह दारुड्यांचा अड्डा झाले आहे. जालन्यातले रंगकर्मी म्हणवणारे लोक काय फक्त मिरवण्यासाठी आहेत का? शहरातील सांस्कृतिक वातावरण टिकवण्याची जबाबदारी कलावंतांवरच आहे. केवळ नगर पालिकेच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा या कलाकारांनी जिल्हाधिकार्‍याकडे जाऊन बसावे, निवेदन द्यावे, नगराध्यक्षाला घेराव घालावा, मुख्याधिकार्‍याला जाब विचारावा. नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर गावभर बोंब करावी. राक्षसाचा प्राण जसा पोपटात असतो तसा पुढार्‍यांचा प्राण मतदारांत असतो. त्यामुळे कलावंतांनी मतदारांमध्ये असंतोष निर्माण केला पाहिजे. पुढार्‍यांना उघडे पाडले पाहिजे. पण कुणीच काही बोलत नाही. जालन्यातल्या संवेदना बोथट झाल्या आहेत. अनेक कलाकार पुढार्‍यांचे हातपाय दाबण्यात धन्यता मानतात. अशा शहराचे सांस्कृतिक भविष्य काय असणार आहे?"

'जालना, सोने का पालना' अशी म्हण आमच्याकडे प्रसिद्ध आहे. हे शहर उद्योग, व्यापारातून प्रचंड पैसे कमावते. या शहरात दोन नद्या आहेत. नुकतेच त्यांचे खोलीकरण व रुंदीकरण इथल्याच उद्योजक, व्यापारी व इतर नागरिकांनी केले. त्यात पावसाचे प्रचंड पाणी साठले. मात्र येथील सांस्कृतिक टंचाई कायम आहे. या शहराला केवळ पैसे कमावण्याचे व्यसन आहे. अयोध्येतील राम-मंदिरासाठी महाराष्ट्रातून सर्वात जास्त पैसे याच शहरातून पाठवले गेले. कोट्यवधींची रक्कम होती ती! पण त्याच शहरातील नाट्यगृहासारखी महत्त्वाची इमारत बकाल अवस्थेत आहे याची खंत आम्हाला वाटत नाही. आपल्या आजूबाजूचा समाज आणि पिढ्या नाट्यगृहामुळे सुसंस्कृत होतील, असे आम्हाला का वाटत नसावे?

शहराचे व जिल्ह्याचे राजकारण आपल्या तालावर थयथय नाचवणार्‍या जालना नावाच्या सोन्याच्या पाळण्याला सांस्कृतिक गंज चढला आहे. हा गंज घासून काढू, असे कुणी म्हटले की, एक प्रश्न हमखास विचारला जातो... त्यावाचून काही 'अडलंय का?'

नाट्यगृहासाठी काय करावे?

1. सर्व नाट्यकलावंतांनी व पत्रकारांनी एकत्र येऊन समिती स्थापन करावी.
2. लोकशाही मार्गाने एक मोठे लक्षवेधी आंदोलन करावे. नगर पालिका, जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने द्यावी. रस्त्यावरून नागरिकांसह मूक निषेध मोर्चा काढावा आणि सोशल मीडियावरून हे आंदोलन पेटते ठेवावे.
3. आंदोलन झाल्यावर थांबू नये. गप्प राहू नये. दर पंधरा दिवसांनी बैठक घेऊन पत्रकारांच्या मदतीने मागण्यांचा पाठपुरावा करावा.
4. नाट्यगृह पुन्हा सुसज्ज होत नाही तोवर चिकाटीने पाठपुरावा करत रहावा. त्याच्या नोंदी ठेवाव्या. सतत केलेल्या पाठपुराव्यात बदल घडवण्याची मोठी क्षमता असते. 
5. नाट्यगृह सुरू झाल्यानंतर तेथे कडक सुरक्षा व्यवस्थेसाठी पाठपुरावा सुरू करावा. सीसीटीव्ही लावून घ्यावे.
6. नाट्यगृहावर ओरखडा जरी उमटला तरी पुन्हा तितक्याच त्वेषाने आंदोलनाची तयारी ठेवावी.
7. सांस्कृतिक वातावरण टिकवण्यासाठी मनातली आग धगधगती ठेवावी. पुढच्या पिढ्यांनाही हा वारसा सोपवावा.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget