World Theatre Day 2023: 'नमन नटवरा विस्मयकारा...' आज जागतिक रंगभूमी दिन; जाणून घ्या इतिहास
आज जगभरात जागतिक रंगभूमी दिन (World Theatre Day 2023) साजरा केला जात आहे. जाणून घेऊयात जागतिक रंगभूमी दिनाच्या इतिहासाबद्दल...
World Theatre Day 2023: तिसरी घंटा वाजते, पडदा उघडतो आणि प्रेक्षक वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतात. रंगभूमी ही अशी जादूई जागा आहे, जिथे काल्पनिक विश्व प्रेक्षकांसमोर मांडलं जातं. कधीकधी माणसाला आरसा दाखवण्याचं काम देखील रंगभूमीवरील कलाकृती करतात. रंगभूमीवर कलाकृती सादर करुन कलाकार रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. आज त्याच रंगभूमीला अभिवादन करण्याचा दिवस आहे. आज जगभरात जागतिक रंगभूमी दिन (World Theatre Day 2023) साजरा केला जात आहे. जाणून घेऊयात जागतिक रंगभूमी दिनाबद्दल...
जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास
जागतिक रंगभूमी दिन हा दिवस साजरा करण्याचा निर्णय 1961 मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने घेतला. यानिमित्ताने दरवर्षी जागतिक रंगभूमी दिनाचा संदेश एखाद्या देशाच्या नाट्य कलावंताकडून दिला जातो. 1962 मध्ये, फ्रान्सचे जीन कॉक्टो हे आंतरराष्ट्रीय संदेश देणारे पहिले कलाकार होते. पहिले नाटक अथेन्समधील एक्रोपोलिस येथे असलेल्या डायोनिससच्या थिएटरमध्ये घडल्याचे सांगितले जाते. हे नाटक पाचव्या शतकाच्या सुरुवातीचे मानले जाते. यानंतर थिएटर संपूर्ण ग्रीसमध्ये वेगाने पसरले.
इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटतर्फे दरवर्षी एक कॉन्फरन्स आयोजित केली जाते. ज्यामध्ये जगभरातून एक थिएटर आर्टिस्ट निवडला जातो, जो जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगाला एक खास संदेश देतो. हा संदेश सुमारे 50 भाषांमध्ये अनुवादित केला जातो. 2002 मध्ये भारतातील प्रसिद्ध अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांना जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगाला संदेश देण्याचा मान मिळाला होता. तुघलक, नागमंडल या नाट्यकृतींचं दिग्दर्शनही गिरीश कर्नाड यांनी केलं होतं. निशांत, मंथन, पुकार यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
रंगभूमीवर विविध सादरीकरण केले जातात. नृत्य, नाटक इत्याची कलाकृती रंगभूमीवर सादर केल्या जातात. वीर, श्रृंगार, करुणा, हास्य, भयानक, रौद्र, वीभत्स, अद्भुत, शांत हे नवरस कलाकार रंगभूमीवर सादर करतो. कलाकाराच्या सादरीकरणानं प्रेक्षक अनेरवेळा भारावून जातात.
थेस्पी हा प्राचीन ग्रीक कवी होता. त्याचा जन्म इकेरियस या शहरात झाला. काही प्राचीन ग्रीक स्त्रोतांनुसार, नाटकात पात्र साकारणारा अभिनेता म्हणून रंगमंचावर अभिनय करणारा तो पहिला व्यक्ती होता.
पहिली थिएटर अभिनेत्री
मार्गारेट ह्यूजेस या पहिल्या थिएटर अॅक्ट्रेस आहेत. यांनी 8 डिसेंबर 1660 रोजी व्हेरे स्ट्रीट थिएटरमध्ये न्यू किंग्स कंपनीच्या निर्मितीच्या शेक्सपियरच्या ओथेलोमध्ये डेस्डेमोनाची भूमिका साकारली.
महत्वाच्या इतर बातम्या: