India-China Border Tension भारत-चीन सैन्यात झटापट,तीन भारतीय जवान शहीद,चीनचेही काही जवान मारले गेले
नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर काल रात्री गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. यामध्ये भारतीय लष्कराच्या एका कमांडिंग ऑफिसरसह दोन जवान शहीद झाले आहेत. दोन्ही बाजूंनी गोळीबार मात्र झाला नाही, असं लष्कराकडून सांगितलं गेलं आहे. दरम्यान दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढताना दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली आहे. जे घडलं ते टाळता येऊ शकलं असतं, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आलं की, चीनला एलएसीची (लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) स्थिती बदलायची होती. 15 जूनच्या संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी चीनने सद्यस्थिति बदलण्याच्या प्रयत्नातून दोन्ही बाजूने एक हिंसक झडप झाली. या संघर्षात दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाले. मात्र ही परिस्थिती टाळता आली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं की, उच्च पातळीवर झालेला हा करार चीनच्या बाजूने मोडला गेला आहे.