IND Vs AFG: अफगाण विरोधात रोहितसेना सज्ज, विराट कोहलीचाही सहभाग, या खेळाडूंना मिळाली संधी
IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माचे कर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे.
मुंबई : रोहित शर्माचे (Rohit Sharma) कर्णधार म्हणून टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन झाले आहे. विराट कोहलीही (Virat Kohli) पुन्हा एकदा टीम इंडियाकडून टी-20 फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. या दोन्ही खेळाडूंना अफगाणिस्तान (Afganistan) विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत स्थान देण्यात आले आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे या मालिकेत सहभागी होणार नाहीत. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड देखील या मालिकेत दिसणार नाहीत. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांना यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे शेवटचे नोव्हेंबर 2022 मध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसले होते. या दोन खेळाडूंचे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाल्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकातही खेळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर तो पुन्हा एकदा टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळताना दिसणार आहे.
अनुभवी खेळाडू संघाबाहेर
हार्दिक पांड्याने नोव्हेंबर 2022 पासून टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र दुखापतीमुळे तो संघाचा भाग असणार नाही. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या आता थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. इशान किशनच्या जागी निवडकर्त्यांनी संजू सॅमसनवर विश्वास व्यक्त केला असून तो बऱ्याच कालावधीनंतर टी-20 संघात परतला आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यरसाठीही टी-20 संघाचे दरवाजे बंद झाले आहेत.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत गोलंदाजीतही बदल झालेला पाहायला मिळणार आहे. युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना संधी मिळालेली नाही. फिरकीची जबाबदारी अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांच्याकडे आहे. वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार या युवा खेळाडूंवर आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे.
असा असणार भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्वोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव. , मुकेश कुमार, आवेश खान.