Nashik Crime : नाशिक जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, माजी वैद्यकीय अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
Nashik Crime : नाशिक जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि माजी वैद्यकीय अधिकाऱ्यासह अन्य तीन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime : नाशिक जिल्हा रुग्णालय (Nashik Civil Hospital) हे विविध घडामोडींमुळे सातत्याने चर्चेत असते. चार दिवसांपूर्वीच सिव्हिल सर्जन डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यावर मारहाणीचे आरोप झाल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता नाशिक जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यावर मारहाणीचा आरोप केलेल्या माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी वि. डी. पाटील यांच्यासह अन्य तीन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी वि. डी. पाटील आणि माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार यांच्यासह अन्य तीन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. प्रतीक भांगरे यांच्याकडून 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे.
खंडणी मागणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात
दिपाली झोले या रुग्णाचा मागील महिन्यात मृत्यू झाला होता. या महिलेचा डॉ. भांगरे यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत 10 लाखांची मागणी संशयितांनी केली आहे. खंडणी मागणाऱ्या तिघांना सरकारवाडा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामुळे नाशिक मोठी खळबळ उडाली आहे.
चार दिवसांपूर्वी केला होता मारहाणीचा आरोप
दरम्यान, चार दिवसांपूर्वी माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार यांनी सिव्हिल सर्जन डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यावर मारहाणीचे आरोप केले होते. आरोग्य विभागाच्या वतीने त्र्यंबक रोडनजीकच्या महात्मानगर मैदानावर क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी सामन्यादरम्यान पूर्वी सिव्हिल रुग्णालयाशी संबंधित, पण सध्या खासगी प्रॅक्टिस करणारे डॉ. आनंद पवार हेदेखील मैदानावर उपस्थित होते. यावेळी डॉ. पवार यांना बघताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी डॉ. पवार यांच्या दिशेने अंगावर धावून जात पवार यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्जही सादर करण्यात आला होता. त्यात मारहाण करण्यासाठी बॅटचा देखील वापर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. मात्र, याबाबत आपणास कुठलीच माहिती नसून, अशा प्रकाराशी आपला काडीमात्रही संबंध नसल्याचे सांगत जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोप फेटाळले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

