Russia Ukraine War : रशियाची युद्धनौका बुडण्यामागे अमेरिकेचा हात? युद्धात अमेरिकेची भूमिका काय?
Sinking of Russian Warship : व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन साकी यांनी सांगितलं की, 'युक्रेनकडे रशियन जहाजांवर निगराणी ठेवणे आणि त्यांच्यावर हल्ला करण्याची यंत्रणा आहे.'
Sinking of Russian Warship Moskva : युक्रेनकडून रशियाची (Ukraine Russia War) युद्धनौका नष्ट करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी या घटनेमध्ये अमेरिकेचा काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. युक्रेनने रशियाची युद्धनौका मॉस्कवा नष्ट केली. हा रशियाला मोठा धक्का मानला जात आहे. मॉस्कवा युद्धनौकेवर मिसाईलसह इतर यंत्रसामग्री होती. या घटनेच्या एका दिवसापूर्वीच एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले होते की, अमेरिकेने युक्रेनला जहाजाच्या स्थानाची माहिती दिली होती. दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्यात व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनने त्यांची भूमिका मर्यादित असल्याचं सांगितलं. व्हाईट हाऊसनं म्हटलं की, युक्रेनियन सैन्य स्वतःचे निर्णय घेईल. आतापर्यंच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेला युक्रेनला पाठिंबा देताना अमेरिका आणि रशिया यांच्यात थेट संघर्ष टाळायचा आहे, असे दिसून येते.
'युक्रेनची स्वतःची गुप्तचर यंत्रणा आहे'
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी सांगितले की, 'युक्रेन युद्धनौकेवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे, याची आम्हांला माहिती नव्हती. युक्रेनकडे रशियन नौदल जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि लक्ष्य करण्यासाठी स्वतःची गुप्तचर क्षमता आहे.'
अमेरिकेने युक्रेनला 3.4 बिलियन डॉलरहून अधिकची मदत
अमेरिका सरकारने युक्रेनला 3.4 बिलियन डॉलरपेक्षा जास्त मदत दिली आहे. तसेच अमेरिकेचं सैन्य युक्रेनियन सैनिकांना हॉवित्झर, ड्रोन आणि इतर लढाऊ उपकरणे वापरण्यासाठी प्रशिक्षण देत आहे. व्हाईट हाऊसने शुक्रवारी युक्रेनला अतिरिक्त 150 दशलक्ष डॉलरची लष्करी मदत जाहीर केली.
पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, 'युक्रेनला अमेरिकेकडून रशिया संबंधित गुप्तचर माहिती मिळते. परंतु युक्रेनला इतर देशांकडूनही मदत मिळत आहे. त्यामुळे युक्रेन स्वत: चे निर्णय घेत आहे.' पेंटागॉनच्या प्रवक्त्यांनी पुढे सांगितले की, अमेरिकेला मॉस्कवा जहाजावरील युक्रेनच्या हल्ल्याची अगोदर माहिती नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या
- Russia Ukraine War : रशियन सैन्याचे 19 टँक आणि 20 वाहनं नष्ट, युक्रेनचा दावा
- Russia Ukraine War : रशियाला आणखी एक झटका, दोन जहाज नष्ट केल्याचा युक्रेनचा दावा
- Russia Ukraine : युक्रेनकडून रशियाचा रणगाडा उद्धवस्त, पण चिंता भारताची वाढली!
- Taliban : तालिबान्यांचं नवं फर्मान, आता महिलांसाठी 'हा' नवा नियम