चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून coronavirus चा प्रसार झाल्याची शक्यता नाही : WHO
coronavirus : अमेरिकेसह अनेक देशांनी चीनच्या वुहानमधल्या बायो लॅबमधून कोरोनाव्हायरसचा प्रसार झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु वुहानमधल्या लॅबमधून कोरोनाव्हायरसचा फैलाव झाल्याची शक्यता नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.
वुहान (चीन) : चीनच्या वुहानमधल्या प्रयोगशाळेतून कोरोनाव्हायरसचा फैलाव झाल्याची शक्यता नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. तसंच वैज्ञानिकांनी हे देखील म्हटलं की, "कदाचित मध्यवर्ती प्रजातीद्वारे कोरोना व्हायरसने मानवी शरीरात प्रवेश केला असावा." डब्लूएचओचे अन्न सुरक्षा आणि प्राणी रोग तज्ज्ञ पीटर बेन एम्बारेक यांनी मध्य चीनच्या वुहान शहरात कोरोनाव्हायरसच्या संभाव्य उत्पत्तीच्या तपासातील आपल्या आकलनातून हा दावा केला आहे.
वुहानमध्ये सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण जगातील कोरोनाबाधित रुग्ण पहिल्यांदा चीनच्या वुहानमध्येच डिसेंबर 2019 मध्ये सापडला होता. यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी वुहानमधल्या बायो लॅबमधून कोरोनाव्हायरसचा प्रसार झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. याशिवाय चीनच्या वेट मार्केटमधूनही कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचं म्हटलं होतं.
प्राण्यांमधून कोरोनाव्हायरस पसरल्याचा वैज्ञानिकांचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या पत्रकार परिषदेत सिंघुआ विद्यापीठातील चिनी वैज्ञानिक लियांग वानियान म्हणाले की, "SARS-CoV-2 वटवाघुळ आणि खवल्या मांजरांमध्ये आढळको. कदाचित कोरोना विषाणूच्या संसर्गाचं कारण हेच असू शकतात कारण कोरोना व्हायरस आणि SARS मध्ये साम्य आहे. मात्र या प्रजातींमध्ये अद्याप SARS-CoV-2 चा प्रत्यक्ष संबंध आढळलेला नाही."
आमचे प्राथमिक निष्कर्ष सांगतात की, एका इंटरमेडिएट होस्ट प्रजातीच्या माध्यमातून विषाणूचा फैलाव झाल्याची शक्यता सर्वाधिक आहे. हे सिद्ध करण्यासाठी अधिक अभ्यास आणि अधिक ठराविक संशोधनाची आवश्यक आहे. निष्कर्षानुसार, प्रयोगशाळेतून कोरोना विषाणाचा प्रसार झाल्याची दावा योग्य नाही.
23 लाख लोकांचा बळी घेणारा कोरोना आला कुठून याबाबत जग अनभिज्ञ या घातक विषाणामुळे जगभरात आतापर्यंत 2,338,319 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाबाधिकांचा आकडा 107,079,812 झाला आहे. परंतु कोरोना विषाणूचा प्रसार नेमका कुठून झाला याबाबत अद्याप कोणालाही स्पष्टता नाही. याआधी डब्लूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी तज्ज्ञांच्या टीमला आवश्यक परवानगी न दिल्याने चीनवर टीका केली होती.