Coronavirus नेमका आला कुठून, कसा फैलावला; निरीक्षणातून मिळाले नवे संकेत
हा विषाणू अतिशय गुंतागुंतीच्या परिस्थितीत फैलावला आहे, त्यामुळं त्याचा प्रवासमार्ग शोधणं हे आव्हानात्मक आणि अधिक वेळ घेणारं काम आहे.
मुंबई : कोरोना विषाणूची (CoronaVirus) उत्पत्ती कुठून झाली याचं निरीक्षण आणि संशोधन करण्यासाठी कार्यरत असणारी संशोधकांची एक टीम सध्या काही महत्त्वाच्या निष्कर्षांवर पोहोचली आहे. ज्यामध्ये त्यांना यातून काही नवे संकेत मिळाले आहेत. 'ब्लूमबर्ग क्वींट'च्या वृत्तानुसार, या निष्कर्षांमध्ये वुहानमधील एका अनपेक्षित ठिकाणाची महत्त्वाची भूमिका दिसून येत आहे.
वुहानमधील ही जागा आहे, तेथील मासळी बाजार. (WHO) अर्थात जागतिक आरोग्य संघटनेकडून राबवण्यात आलेल्या एका मोहिमेत न्यूयॉर्कचे वन्यजीवशास्त्रज्ञ Peter Daszak हेसुद्धा सहभागी होते. आपण वुहानमधून जाण्यापूर्वी निरीक्षणांचा अहवाल सादर करणार असल्याचा दावा त्यांनी केला. या निरीक्षणासाठी त्यांच्या 14 जणांच्या चमूनं अनेक तज्ज्ञांसोबत काम करत काही महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देत कोरोना संसर्गाच्या बाबतीत नेमकं काय आणि कसं घडलं होतं याचा आढावा घेतला.
काय सांगतं निरीक्षण?
वटवाघुळांतून हा विषाणू मानवामध्ये संक्रमित झाला याची अतिशय धुसर शक्यता आणि सिद्धांत आहेत. पण, याचदरम्यान, वुहान इन्स्टिट्युट ऑफ वायरॉलॉजीतून हा विषाणू फैलावल्याचंही त्यांनी खंडन केलं.
निरीक्षणाचे धागेदोरे जोडताना...
कोरोनाच्या उत्पत्ती आणि संसर्गाबाबतच्या या मोहिमेअंतर्गत प्राणांचा संभाव्य सहभाग, त्यांच्यामध्ये विषाणूचा फैलाव आणि पर्यावरणातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेतला. अनुवांशिक क्रमवारीची माहिती यामध्ये अभ्यासकांना रुग्ण आणि वन्यजीवांमध्ये असणाऱ्या संपर्काबाबतचे धागेदोरे जोडण्यात मदत करत आहे, असं Peter Daszak म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या या निरिक्षण दौऱ्याच्या अखेरीसच अधिकृत माहिती स्पष्ट केली जाईल, तोपर्यंत सदर प्रकरणी गोपनीयता पाळण्यात येणार असल्याचं सांगितलं.
पीटर यांनी ह्युनान फ्रेश प्रोड्युस मार्केटला भेट दिली, जिथं त्यांना काही संकेत मिळाले. या बाजारात ओली मासळी आणि ताज्या मांसाची बहुतांश विक्री केली जाते. ही बाब संशोधनाच्या सुरुवातीकडे लक्ष वेधते. जिथं येथील कर्मचारी आणि दुकानदारांमध्ये संक्रमण पाहिलं गेलं होतं. शिवाय या विषाणूचा संसर्ग प्राण्यामधून माणसांमध्ये झाल्याचाही दावा करण्यात आला होता.
निरीक्षणात समोर आलेल्या गोष्टी...
सदर निरीक्षणाबाबत या बाजाराची असणारी भूमिका सविस्तर स्वरुपात सांगण्यास मात्र पीटर यांनी नकार दिला. सध्या आपण सर्व मुद्दे एकत्र आणून ते जोडू पाहत आहोत. फूड मार्केटविषयी सांगावं तर, कोरोनाबाधित आढळू लागल्यानंतर इथं स्वच्छतेचे निकष तातडीनं अंमलात आणले गेले. लोकं गेली त्यांनी सामान, भांडी आणि जे काही तिथंच सोडलं ते सारं आम्ही पाहिलं. आम्हाला आता अशा गोष्टी ठाऊक आहेत ज्या याआधी आम्हाला ठाऊक नव्हत्या. पण, अद्यापही हे सारं सुरु कुठून झालं, रुग्णालयात जाणाऱ्यांपेक्षाही इतर आणखी कितीजणांना या विषाणूची लागण झालेली या अनेक गोष्टींवर आम्ही काम करत आहोत.
कोरोनाचा हा विषाणू अतिशय गुंतागुंतीच्या परिस्थितीत फैलावला आहे, त्यामुळं त्याचा प्रवासमार्ग शोधणं हे आव्हानात्मक आणि अधिक वेळ घेणारं काम आहे. असं म्हणत आपला दौरा संपण्यापूर्वी या सर्व बाबी एका निष्कर्षापर्यंत पोहोचवतील अशी माहिती पीटर यांनी 'ब्लूमबर्ग क्वींट'ला दिली.