सांगलीतील विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा 'पांडोझरी पॅटर्न', मुलांच्या आग्रहाखातर 40 कुटुंबातील पुरुषांनी सोडला मावा अन् दारू
Sangli News: मुलांनी आपल्या पालकांकडे आग्रह धरला आणि पालकांनी दारू, तंबाखू आणि माव्यासारखी व्यसनं सोडली.
![सांगलीतील विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा 'पांडोझरी पॅटर्न', मुलांच्या आग्रहाखातर 40 कुटुंबातील पुरुषांनी सोडला मावा अन् दारू Pandozeri pattern of students and teachers in Jat Sangli men of 40 families gave up mava and alcohol सांगलीतील विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा 'पांडोझरी पॅटर्न', मुलांच्या आग्रहाखातर 40 कुटुंबातील पुरुषांनी सोडला मावा अन् दारू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/21/103c9fd68c818cb62ba00c167558cab8167431131333593_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sangli News Updates : सध्याच्या समाजातील व्यसनाधीनतेचे प्रमाण चिंताजनक आहे, पालकांच्या व्यसनाचा परिणाम थेट त्याच्या मुलांवरही होताना दिसत आहे. पण व्यसन सोडा असा हट्ट मुलांनी पालकांकडे धरला तर दारू, तंबाखू, माव्याची व्यसनं सोडणारीही अनेक उदाहरणं समाजात आहेत. नेमका हाच धागा पकडत सांगलीच्या जत तालुक्यातल्या पांडोझरी या गावात जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून व्यसनमुक्तीचा एक पॅटर्न राबवला. लहान मुलांनीच आपापल्या घरात सलग पाच वर्षे राबवलेल्या या मोहिमेमुळे तब्बल 40 कुटुंबातील पुरुषांनी व्यसनमुक्तीचा मार्ग धरला.
सांगलीतील जत तालुक्यातल्या पांडोझरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाने क्रांती केली आहे. ही क्रांती आहे व्यसनमुक्तीची. पाच वर्षांपूर्वी बाबर वस्तीतल्या शाळेतील शिक्षक आणि मुलांनी व्यसनमुक्तीची चळवळ हाती घेतली. घरोघरी शिक्षक आणि मुलांनी जाऊन व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली.
मुलांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या चांगल्या-वाईट सवयी ओळखल्या. विद्यार्थ्यांनी दारू, विडी-सिगारेट, मावा, गुटखा, तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी कशा प्रकारे हानिकारक आहे यावर चर्चा केली. मग काय... या मुलांनी आपल्या वडिलांकडे, घरातल्या व्यसनाधीन बनलेल्या नातेवाईकांकडे व्यसन सोडण्याचा हट्ट धरला.
व्यसन करणारे वडील असो किंवा आजोबा, त्यांना ही मुलं व्यसन कसं वाईट आहे हे पटवून देऊ लागले. तरीही वडील, आजोबा व्यसन सोडत नाहीत म्हटल्यावर न जेवण्याचा आणि न बोलण्याचा हट्ट केला.
मुलं पालकांनी व्यसन सोडावं म्हणून रुसवा धरू लागली अन्...
शेवटी शेवटी ही मुलं पालकांनी व्यसन सोडावं म्हणून रुसवा धरू लागली. शेवटी मुलांचा हट्ट पाहून व्यसन करणाऱ्यांचा देखील नाईलाज होऊ लागला आणि मुलांच्या चेहऱ्याकडे आणि त्याच्या हट्टाकडे पाहून अनेक पालकांनी मग दारू, तंबाखू, गुटख्याचा नाद सोडायचा निर्णय घेतला. अखेर शिक्षक आणि मुलांच्या पाच वर्षांच्या तपश्यर्चेला चांगली फळं आली आणि वडिलांना व्यसनमुक्त करणाऱ्या मुलांनी आपणही व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे याचा धडाच शाळेत गिरविला याचे समाधान पालकांमध्ये आहे.
आज समाजातील व्यसनाधिनतेचे प्रमाण आणि संख्या पाहिली तर ती चिंताजनक आहे. पण मुलांनी व्यसन सोडा असा पालकांकडे हट्ट धरला तर व्यसनं सोडणारीही अनेक उदाहरणे समाजात आहेत. हाच धागा पकडत या मुलांनी आणि शिक्षकांनी व्यसनमुक्तीची मोहीम राबवली ही मोहीम कौतुकास्पद तर आहेच शिवाय अनुकरणीयदेखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)