कोरोनाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असाल तर कच्च्या मालावरील निर्बंध उठवा, सीरमच्या अदर पूनावालाचं अमेरिकी अध्यक्ष ज्यो बायडेन यांना ट्वीटरवर आवाहन
कोरोना लस निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या संदर्भात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना आवाहन केलंय.Poonawala Requests US President: जर कोरोनाचा नायनाट करण्यासाठी एकजूट असाल तर लस उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवा : अदार पूनावाला
पुणे : देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच देशातील सर्वात मोठी औषधी उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ, अदार पूनावाला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना लसीकरणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचे आवाहन केलंय. पूनावाला यांनी ट्वीट करत ही मागणी केली आहे.
शुक्रवारी अदार पूनावाला यांनी ट्वीट केले की, “ आदरणीय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, (President of the United States), जर आपण खरोखरच विषाणूचा पराभव करण्यासाठी एकजूट असाल तर मी तुम्हाला विनंती करतो की अमेरिकेबाहेरील लस उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवा. जेणेकरुन लसीचे उत्पादन वाढवता येईल. आपल्या प्रशासनाकडे सविस्तर माहिती आहे." अद्याप यावर अमेरिकेकडून कोणतेही उत्तर आलेलं नाही.
नवीन लसीला मान्यता
देशभरात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. दोन दिवसांत देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांनी 2 लाखांचा टप्पा पार केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, अनेक राज्यांनी शनिवार व रविवारच्या कर्फ्यूसह अनेक उपाययोजना केल्या आहेत. दुसरीकडे अधिकाधिक लोकांना लवकरात लवकर कोरोना लस देण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. यामुळे, स्पुटनिक लसीला आपात्कालीन वापरास सरकारने मान्यताही दिली आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही लसींना परवानगी दिली जाऊ शकते.
देशातील परिस्थिती चिंताजनक
देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 2.17 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली असून 1185 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 1.18 लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. या आधी, बुधवारीही दोन लाखांच्या वर कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडली होती. त्यामुळे देशातली परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचं दिसून येतंय.
देशातील आजची कोरोनाची स्थिती
- एकूण रुग्णसंख्या : 1 कोटी 42 लाख 91 हजार 917
- कोरोनावर मात केलेले एकूण रुग्ण : 1 कोटी 25 लाख 47 हजार 866
- सध्याचे सक्रिय रुग्ण : 15 लाख 69 हजार 743
- एकूण मृत्यू : 1 लाख 74 हजार 308
- एकूण लसीकरण : 11 कोटी 72 लाख 23 हजार 509