जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?
"जिथे उजडेल तिथे उजडेल" आता मी तुमचे प्रकरण काढतो आणि तुम्ही माझे प्रकरण काढा. आता, मी अन्याय सहन करणार नाही, पक्षाने दखल न घेतल्यास एमआयएममध्ये जायची तयारी आहे

बीड : राज्यात बीड जिल्हा गेल्या 3 महिन्यांपासून चर्चेत असून सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून सर्वत्र संताप पाहायला मिळाला. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी ह्या प्रकरणात स्वत: घातले असून देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी मी आरोपींना फाशी होईपर्यंत असणार आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे, आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हेही माध्यमांमधील चर्चेत आहेत. त्यातच, मंत्री धनंजय मुंडेंची (Dhananjay Munde) भेट घेतल्याने सुरेश धस पुन्हा मिडिया व सोशल मीडियावर टीकेचे धनी बनले होते. आता, आमदार सुरेश धस यांच्यामुळे आपल्याला त्रास होत असल्याचे सांगत माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमदार सुरेश धस यांच्या वर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, सुरेश धस यांच्यामुळे आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अजित पवार गट सोडून जायची वेळ आली तर आपली तयारी असल्याचं आजबे यांनी म्हटलंय.
"जिथे उजडेल तिथे उजडेल" आता मी तुमचे प्रकरण काढतो आणि तुम्ही माझे प्रकरण काढा. आता, मी अन्याय सहन करणार नाही, पक्षाने दखल न घेतल्यास एमआयएममध्ये जायची तयारी आहे, अशा शब्दात अजित पवार गटाचे माजी नेते आणि आमदार बाळासाहेब आजबेंनी पक्षनेतृत्वाला इशारा दिला आहे. तसेच, आजबे यांनी देवस्थानच्या जमिनी बळकावल्याबाबत आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. धस यांच्या कार्यकर्त्यांच्या नावावर मतदारसंघातील विविध ठिकाणच्या देवस्थानच्या जमिनी करण्यात आल्या आहेत, असा आरोप आजबे यांनी केला. तसेच, महायुतीमध्ये एकत्र असून धस यांच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय, त्यांची बिले अडवली जात आहेत, असेही त्यांनी म्हटले.
महायुतीमध्ये असताना बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आमची कामे अडवली गेली, कार्यकर्त्याची बिले अडवली. या संदर्भात वारंवार तक्रार करुनही महायुतीत आमची दखल घेतली जात नसेल तर स्वतंत्र निर्णय घेऊ. भलेही एमआयएममध्ये जाऊ असा इशारा बीडच्या आष्टी मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाची माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिला आहे. मी अन्याय सहन करणारा माणूस नाही, माझ्या पक्षाने माझी दखल न घेतल्यास एमआयएममध्ये जायची वेळ आली तरी माझी तयारी आहे, असे बाळासाहेब आजबे यांनी म्हटले. माझ्या कुटुंबाला अटक करण्यासाठी खोटे पत्र दिले आहे, असेही आजबे यांनी म्हटले. मी सुरेश धस यांना कुठेही सुट्टी देणार नाही, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळविले आहे. अजित दादाना सांगितले आहे, आम्हाला जर महायुतीमध्ये असताना काम चालू करणे आणि बिल करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर निर्णय घेऊ असा इशाराही त्यांनी दिलाय.
























