Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
Navneet Rana : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. यावर नवनीत राणा यांनीसंतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Navneet Rana : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील टवाळखोर एका पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील या प्रकरणात विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे म्हटले आहे. आता छेडछाड प्रकरणावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या की, रक्षाताई खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड झाली, व्हिडीओ बनवला, राज्याचे मुख्यमंत्री हे सक्षम आहेत. मुलगी कोणाची ही असो जर असे प्रकार झाले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आमचं सरकार कारवाई करण्यामध्ये सक्षम आहे. दुःख या गोष्टीचं वाटत आहे की, ते एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत.
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी
तुम्ही राजकारण कोणत्याही पातळीवर न्या. पण असे प्रकार करू नका, हाथ जोडून विनंती करते. राजकारण गेलं खड्ड्यात, जर कोणी राजकीय व्यक्ती असं करत असेल तर भरचौकात आणून त्यांना फाशी द्यावी. जर राजकीय व्यक्ती असे करत असतील तर हे खूप निंदनीय गोष्ट आहे. आमचे गृहमंत्री कडक कारवाई करणार आहेत. मुलगी कोणाचीही असो. ती राज्यात सुरक्षित आहे आणि सुरक्षित राहणार, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. यानंतर टवाळखोर तरुणांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. टवाळखोर व छेडखानी करूनही तरुण मोकाट असल्याने रक्षा खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला. यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी अनिकेत भोई,पीयूष मोरे, सोम माळी,अनुज पाटील किरण माळी या पाच जणांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत भोई याला पोलसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
आणखी वाचा



















