(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Ncp news : महागाई, बेरोजगारी विरोधात महिला एकवटणार; उद्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा पुण्यात शुभारंभ
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा उद्या (4 जानेवारी) पुण्यात शुभारंभ करण्यात येणार आहे. महागाई, बेरोजगारीच्या अन्याय अत्याचारा विरोधात देखील अशाच प्रकारचा जागर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे .
Pune Ncp news : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर (Pune Ncp news) यात्रेचा उद्या (4 जानेवारी) पुण्यात शुभारंभ करण्यात येणार आहे. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेला एक जानेवारी 2023 रोजी 175 वर्षे पूर्ण झाले आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यात जनजागर यात्रा सुरू करण्यात येणार आहे. महागाई, बेरोजगारीच्या अन्याय अत्याचारा विरोधात देखील अशाच प्रकारचा जागर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे .
राज्यभर होणार जनजागर -
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणातून तत्कालीन समाज सुशिक्षित झाला त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या जागरामुळे बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय- अत्याचारा विरोधात समाज पेटून उठला आणि समाजातील अनिष्ट रूढी परंपरा संपवण्यात आल्या आणि एका आदर्श समाजाची निर्मिती फुले दांपत्याकडून त्यावेळी करण्यात आली होती. आजच्या काळात गेल्या आठ वर्षापासून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेवर करत असलेल्या महागाई- बेरोजगारीच्या अन्याय अत्याचारा विरोधात देखील अशाच प्रकारचा जागर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे संपूर्ण राज्यभरात महिलांकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर जागर यात्रा करण्यात येणार आहे. ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक शहर आणि तालुक्यात जाणार आहे.
मागील 9 वर्षात गॅस सिलेंडर, जीवनावश्यक वस्तू , पेट्रोल , डिझेल सीएनजी यांच्या किमतींमध्ये झालेली वाढ, सर्वसामान्य लोकांच्या खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांवर आलेली कुऱ्हाड, सुशिक्षित तरुणांवर कोसळलेले बेरोजगारीचे संकट, महाराष्ट्रातून मोठमोठ्या कंपन्या इतर राज्यांमध्ये पळविण्याचे सुरू असलेले उद्योग आणि राज्यातील लोकशाहीला घातक असणाऱ्या घडामोडी घडत राज्य सरकार पाडण्यासाठी केले गेलेली कट कारस्थाने, महिला भगिनींवर होणारे अत्याचार अशा विविध मुद्द्यांवरती समाजाचे जागर करण्याचं काम ही जन-जागर यात्रा करणार आहे.
शरद पवार करणार शुभारंभ -
पुणे शहरातील हॉटेल सेंट्रल पार्क येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या जन -जागर यात्रेचा शुभारंभ उद्या (4 जानेवारी) दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण असं करत महाराष्ट्रातील सर्वच विभागांमध्ये ही जनजागृती यात्रा जाणार आहे, माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी दिली आहे. यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजीया खान, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, वैशालीताई नागवडे, मृणालिनी वाणी, आशा मिरगे यादेखील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारीदेखील सहभागी होणार आहे.