(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed Loksabha: ज्योती मेटेंच्या गाठीभेटींना वेग, आधी वंचितकडून उमेदवारीची चर्चा, आता इफ्तार पार्टीत मनोज जरांगेंना भेटल्या
Maharashtra Politics: बीड लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. बीडमधून ज्योती मेटे निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या वंचित बहुजन आघाडीकडून लढू शकतात, अशी चर्चा आहे.
बीड: शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापूर्वी त्यांनी शरद पवार गटाकडून बीड लोकसभेची (Beed Loksabha) उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीडमधून बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढवण्यासाठी पर्यायाच्या शोधात आहेत. या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे (Jyoti Mete) यांच्या गाठीभेटींना वेग आला आहे. त्यांनी शुक्रवारी बीड येथील इफ्तार पार्टीत मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रमुख चेहरा असणाऱ्या मनोज जरांगे यांची भेट घेतली.
बीडच्या मादळमोही येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि ज्योती मेटे एकत्र आले होते. हे दोघे धार्मिक कार्यक्रमानिमित्त एकत्र जरी आले असले तरी दोघांची एकत्र भेट झाल्याने राजकीय वर्तुळात मात्र चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार राष्ट्रवादी गटाने ज्योती मेटे यांना लोकसभेची उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे आता ज्योती मेटे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शरद पवार गटाने उमेदवारी नाकारल्यानंतर ज्योती मेटे या बीडमध्ये आल्यानंतर मादळमोही या ठिकाणी रोजा इफ्तार पार्टीला त्यांनी उपस्थिती लावली. याच इफ्तार पार्टीमध्ये मनोज जरांगे पाटील हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये चर्चा देखील झाली त्यामुळे आता निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना ज्योती मेटे आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील आणि ज्योती मेटे यांची भेट महत्त्वाची का?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनासाठी आंतरवाली सराटी हे केंद्र ठेवले होते. जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या काळात मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये पसरले होते. यादरम्यान बीडमध्ये कथित मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांचे घर आणि मालमत्तांची जाळपोळ केली होती. त्यामुळे आंतरवाली सराटीनंतर बीड परिसरात मराठा आंदोलनाचा वणवा चांगलाच पेटला होता.
बीडमधील मराठा समाज आरक्षणाच्यादृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. या कारणामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनाच्या मु्द्द्याचा परिणाम दिसू शकतो. हीच बाब ध्यानात घेऊन शरद पवार यांनी मराठा समाजाच्या बजरंग सोनावणे यांना बीडमधून उमेदवारी दिली आहे. ज्योती मेटे यादेखील मराठा समाजाच्या आहेत. मात्र, बजरंग सोनावणे यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी आणि निवडणूक लढवण्याचा अनुभव असल्यामुळे शरद पवार यांनी त्यांना झुकते माप दिले. त्यामुळे आता ज्योती मेटे या अगदीच अपक्ष लढण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला तर ज्योती मेटे या बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्वसामान्य जनतेची इच्छा मी निवडणूक लढवावी: ज्योती मेटे
ज्योती मेटे यांनी यांना शुक्रवारी शिवसंग्रामच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. शिवसंग्राम भवन या ठिकाणी झालेल्या या बैठकीत होती मेटे यांनी निवडणूक लढवावी, अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. तर पदाधिकारी आणि जनतेत जाऊन त्यांचा कौल जाणून घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार असल्याचे ज्योती मेटे यांनी सांगितले. जेव्हा निवडणूक लढवण्याचा निर्णय होईल तेव्हा माघार घेणार नसल्याचेही त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीने मला उमेदवारी का नाकारली याचे उत्तर महाविकास आघाडीचे प्रमुख देऊ शकतात असेदेखील त्या म्हणाल्या.
आणखी वाचा
बजरंग सोनवणेंना उमेदवारी, ज्योती मेटेंचा पत्ता कट; पंकजा मुंडे म्हणतात...