Nashik : लिपिक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, नाशिक जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत
गेल्या काही दिवसांपासून बोगस प्रमाणपत्र प्रकरणामुळे राज्यभरात नाशिक जिल्हा रुग्णालय चर्चेत आहे. त्यातच आता जिल्हा रुग्णालयातील लिपिकामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

नाशिक: जिल्हा रुग्णालयातील लिपिकाला (Nashik District Hospital Clerk) 24 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. काही दिवसांपूर्वी आरोग्य उपसंचालकाला लाच घेताना पकडण्याचं प्रकरण ताजं असतानाच आज जिल्हा रुग्णालयातील एक वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. राजेश नेहुलकर असं या लाच घेणाऱ्या लिपिकाचं नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराची पत्नी वैद्यकीय उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. या ठिकाणच्या लिपिकाने वैद्यकीय उपचारानंतर त्यांचे वैद्यकीय बिल पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती 24 हजारांवर सौदा ठरला.
मात्र तक्रारदराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात संपर्क साधला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचण्यात आला. यावेळी लाच घेताना जिल्हा रुग्णालयातील राजेश नेहुलकर या वरिष्ठ लिपिकास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई अधीक्षक सुनील कडासाने, अप्पर अधीक्षक नारायण न्हयालदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, प्रभाकर गवळी, नितीन कराड यांनी केली.
सरकारवाडा पोलिसांत गुन्हा
गेल्या 10 ऑगस्ट रोजी तक्रारदाराने लिपिक नेहुलकर याच्याकडे रक्कम कमी करण्यासाठी चर्चा केली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने योग्य तो सापळा रचला होता. या चर्चेत नेहुलकर याने पाच टक्क्यांऐवजी चार टक्क्यांप्रमाणे 24 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या मागणीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे दिसून आले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नेहुलकर यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
