(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक? शुभेच्छांचे पोस्टर्स आणि आनंद शिंदेंच्या गाण्याची साथ
Uddhav Thackeray : शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी राष्ट्रवादीच्या आनंद शिंदे यांनी गाणं रचलं असून ते दसरा मेळाव्याला प्रदर्शित होणार आहे.
मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याला (Dasara Melava) राजकीय डावपेचाचा मेगा एपिसोड पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे. कारण ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या दसरा मेळाव्याला आता राष्ट्रवादीचा (NCP) पाठिंबा असणार आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स झळकताना दिसत आहेत. एवढंच नाही तर आनंद शिंदेंनीही ठाकरे गटासाठी गाणं रचलंय.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या आनंद शिंदे यांनी शिवसेनेसाठी गायलेलं हे गाणं दसरा मेळाव्यालाच प्रसिद्ध होईल. याच अनुषंगाने आनंद शिंदेंनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची भेटही घेतली आहे. खरं तर आनंद शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आनंद शिंदेच्या पक्ष बदलाच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र सुत्रांच्या माहितीनुसार आनंद शिंदे यांनी शरद पवार यांच्या परवानगी नंतरच ठाकरे गटासाठी गाणं तयार केलं आहे आणि अप्रत्यक्षरित्या ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी मदत केली आहे.
उद्धव ठाकरे गटाला मित्र पक्षाकडून होत असलेली ही छुपी मदत भाजपच्या (BJP) नजरेतून मात्र लपून राहिली नाही. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी थेट कवितेतूनच काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला राष्ट्रवादीची छुपी साथ मिळत असतानाच दुसरीकडे शिंदे गटाचा (Eknath Shinde) मित्र पक्ष असलेल्या भाजपने मात्र शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यापासून एक हात लांब राहणंच पसंत केलं आहे. शिंदे गटाची नेमकी ताकत किती याची चाचपणी देखील भाजपकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपची ही भूमिका लक्षवेधी ठरतेय.
दरम्यान, शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर पहिल्यांदाच दसरा मेळावा होणार असून ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्या आधी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे.
शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणण्यात येणार असून लाखोंची गर्दी जमवण्याची तयारी सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार आणि स्थानिक नेत्यांची त्याची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून येतंत.
महत्त्वाच्या बातम्या:
- शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार! ठाण्यातील टेंभी नाक्यावर 9 ऑक्टोबरला घेणार जाहीर सभा
- ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह मिळणार का? शिंदे गटाऐवजी भाजप मैदानात उतरणार का? अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये सस्पेन्स कायम