Nashik Crime : मुलांना शिक्षण अन् स्कॉलरशीप देतो सांगून पालकांना ऑनलाईन गंडा, 46 वर्षीय भामट्याला अटक
Nashik Crime : मुलांना शिक्षण आणि स्कॉलरशिप देतो असं सांगून एका दाम्पत्याला भामट्यानं लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. नाशिक सायबर पोलिसांनी 46 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
Nashik Crime : विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्कॉलरशीप देण्याच्या नावाखाली पालकांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या एका 46 वर्षीय भामट्याला नाशिक सायबर पोलिसांनी ठाणे जिल्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक शहरातील उत्तमनगर परिसरात 39 वर्षीय रवींद्र पांडे हे गेल्या 10 वर्षांपासून आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून त्यांना दोन मुले आहेत, प्लायवूड विक्रीचा ते व्यवसाय करतात. जानेवारी 2020 मध्ये त्यांना एक कॉल आला आणि आम्ही सर्व शिक्षा सोल्यूशन एलएलपी मधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या मुलांना कार्टूनच्या सोप्या भाषेत अभ्यास शिकवला जाईल असे सांगत त्याबदल्यात 12 हजार रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले गेले, Easebuzs पेमेंन्ट लिंक आयडीबीआय बँकेच्या डेबीट कार्डद्वारे त्यांनी हे पैसे पाठवताच 3 दिवसांनी त्यांना एक पेन ड्राईव्ह आणि सिडी पोस्टाने घरपोच मिळाली. त्यानंतर पुढे अशाच प्रकारे त्यांना 4 पार्सल मिळालेत. फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांना पुन्हा एक कॉल आला आणि तुमच्या मुलांना पावणेचार लाख स्कॉलरशीप मंजूर होणार असून मंजुरीसाठी प्रोसेसिंग फी नावाखाली 06 फेब्रुवारी 2020 रोजी 14000 रुपये, 27 फेब्रुवारी 2020 रोजी 15000 रूपये, 13 मार्च 2020 रोजी 39000 रुपये असे एकुण 68000 रुपये लिंकद्वारे पांडे यांना भरण्यास सांगण्यात आले. मात्र ही सर्व प्रक्रिया करूनही स्कॉलरशीपचे पैसे मिळत नसल्याने पांडे यांनी विचारपूस करताच सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने ऑफिस बंद आहे. मार्च 2021 मध्ये ऑफिस सुरु होताच सर्व कामे सुरळीत होतील असे उत्तर त्यांना देण्यात आले.
7 मे 2021 रोजी सर्व शिक्षण सोल्युशन एल.एल.पी. या कंपनीतून आम्ही बोलत असल्याचे पांडेंना सांगण्यात येऊन स्कॉलरशिप मंजुरी मिळाली आहे मात्र आता प्रोसेसिंग फी म्हणून 8400 रुपये त्यांच्याकडून घेण्यात आले त्यानंतर 8 मे 2021 ला मुलांच्या विम्यासाठी 38600 रुपये आणि पुन्हा 12 मे 2021 ला फायनल प्रोसेसिंग फी म्हणून 32500 रुपये कंपनीने सांगितल्यानुसार, पांडे यांनी दिले मात्र 32500 मिळाले नाही पुन्हा टाका असे सांगताच दुसऱ्या दिवशी पुन्हा 32500 रुपये पांडे यांनी भरले. त्याचदिवशी स्कॉलरशिपची रक्कम 3,82,760 रुपये मंजुर झाली असून त्याचा युटीआर क्रमांक मॅसेजव्दारे त्यांना पाठवण्यात येऊन सदरची रक्कम एनईएफटीद्वारे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल, असे आश्वासन पांडेना देण्यात आले. मात्र पैसे जमा तर झाले नाही आणि पुन्हा जीएसटीच्या नावाखाली त्यांच्याकडून 45 हजार रुपयांची वारंवार मागणी केली गेली. मात्र माझ्या जवळचे पैसे संपले असे कारण देऊनही पैशांची मागणी होत असल्याने तसेच कुठलीही स्कॉलरशीपची रक्कम जमा होत नसल्याने पांडे यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत जानेवारी 2020 ते आजपावेतो सर्व शिक्षण सोल्युशन एल.एल.पी.या कंपनीच्या माध्यमातून मुलांच्या अभ्यासक्रम आणि स्कॉलरशिप मंजुरीचे आमिष दाखवून, प्रोसेसिंग फीच्या नावाखाली माझी एकुण 2,72,500 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार देताच पोलिसांनी कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा 2000 नुसार गुन्हा दाखल करून घेत तपासाची चक्रे फिरवली.
तांत्रिक तपासाच्या सहाय्याने ठाणे जिल्ह्यात आरोपींचे धागेदोरे मिळताच पोलिस आयुक्त दीपक पांडे, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देवराज बोरसे आणि त्यांच्या पथकाने 404- ए विंग, देव कॉपोरा, ईस्टर्न एक्सप्रेस वे खोपट ठाणे या ठिकाणी सुरु असलेल्या एका कॉल सेंटरवर छापा टाकून मालक निलेश फर्नांडीसला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून 38 मोबाईल फोन, 3 लॅपटॉप, 2 टॅब, 11 पेनड्राइव्ह आणि 11 सिमकार्ड हस्तगत केले. फर्नांडिसने बी कॉमचे शिक्षण घेतले असून तो एका टेलिकॉम कंपनीतही कार्यरत होता, सध्या तो पोलिस कोठडीची हवा खात असून पुढील तपास पोलिस करतायत, फ़र्नांडीसने महाराष्ट्रात अनेकांना गंडा घातल्याचा पोलिसांना संशय असून अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रार देण्यास पुढे यावं असं आवाहन पोलिसांकडून केल जातय.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येत असून नागरिक अगदी सहजरित्या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतायत त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका तसेच ओटीपी, एटीएम कार्डचा पिन नंबर आणि तुमची वयक्तीक माहिती कुणाला शेअर करू नका असा सल्ला सायबर पोलिसांकडून दिला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :