डेटिंग साईटचा वापर करून तरुणांचे सेक्सटॉर्शन! गडचिरोलीत 12वी नापास सायबर गुन्हेगाराला बेड्या
गडचिरोलीच्या सायबर सेल पोलिसांनी एका 12वी नापास सायबर गुन्हेगाराला सेक्सटॉर्शन प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप नत्थु खेवले (39) रा. वडधा ता. आरमोरी असे आरोपीचे नाव आहे.
गडचिरोली: देशभरात कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सायबर क्राइमचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अनेकदा यातील गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश मिळत नाही. परंतु गडचिरोलीच्या सायबर सेल पोलिसांनी एका 12वी नापास सायबर गुन्हेगाराला सेक्सटॉर्शन प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप नत्थु खेवले (39) रा. वडधा ता. आरमोरी असे आरोपीचे नाव आहे. खेवले हा 12 वी नापास आहे पण यूट्यूब वरून शिकून एखाद्या एक्स्पर्ट सायबर गुन्हेगाराला मागे टाकेल अशाप्रकारे तरुणांचे सेक्सटॉर्शन केल्याचा आरोप आहे. आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्याने प्रॉक्सी सर्व्हर सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे अश्याप्रकारच्या गुन्ह्यात आरोपीला अटक करणे मोठे आव्हान असते. मात्र गडचिरोली सायबर सेलने अवघ्या 12 तासात त्या भामट्याचे मुसक्या आवळल्या.
प्रदीप हा सामान्य गरीब परिवारातील आहे रोजंदारीचे काम करुन आपलं व आपल्या घराचं उदरनिर्वाह करायचा मात्र कोरोनाचं संकट त्यात लॉकडाऊन आणि त्यामुळे प्रदीप घरीच राहायचा. दिवसभर तो मोबाईलवर असायचा त्यामुळे घरच्यांना तो नेमका काय करतो हे लक्षात आले नाही. प्रदीपने आधी पोलिसांना चकमा देण्यासाठी युट्यूबवरून प्रॉक्सी सर्व्हर कसे वापरायचे हे शिकले. मग त्याने आपल्या फोनमध्ये वॉल नावाचे डेटिंग ॲपवर एका मुलीच्या नावाने अकाउंट बनविले. या माध्यमातून तो तरुणांना तरुणी असल्याचे भासवून अश्लील फोटो पाठवायचा.
इतकेच नव्हे तर डेटिंग ॲपवरील बनावट नावाने तो फेसबुक व इंस्टाग्राम वर सुध्दा खाते बनवायचा. त्यावर चॅटिंग केल्यानंतर तो डेटिंग ॲपवर अश्लील व्हिडिओ चॅट करायचा. मग काही दिवसांनी तो समोरच्या व्यक्तीला त्याचाच अश्लील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करून पैश्यांची मागणी करायचा. पीडित तरुणाने पहिल्यांदा त्याला दहा हजार रुपये दिले. मात्र आरोपीने पुन्हा त्याला पैशांसाठी त्रास देणे सुरू केले.
पैसे घेण्यासाठी फिल्मीस्टाईल शक्कल
डेटिंग ॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्यानंतर मागणी केलेले पैसे घेण्यासाठी आरोपीने ऑनलाईन पद्धत न वापरता फिल्मी स्टाईल रोख रकमेची मागणी केली. त्याने पीडित तरुणाला वडधा ते डारली मार्गावरील एका झाडाखाली पैसे ठेवायला सांगितले आणि तरुण गेल्यानंतर आरोपी तिथे जाऊन ते पैसे उचलायचा.
पीडितांची संख्या मोठी
या प्रकरणात केवळ एका पीडित तरुणाने तक्रार नोंदविली असून आरोपीच्या मोबाईलमध्ये असे एकूण वेगवेगळ्या 36 जणांचे अश्लील व्हिडिओ आहेत. त्यामुळे आरोपीने त्यांच्याकडून सुद्धा पैसे लाटले असतील अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पीडीत व्यक्तींनी कुठलीही शंका न बाळगता पोलिसात तक्रार करावी असे आवाहन सायबर सेलने केले आहे.
त्या पीडित तरुणांनी परत पैशाची मागणी होत असल्याचे बघून यावेळी थेट गडचिरोली सायबर सेलकडे तक्रार दाखल केली व सर्व घटना सांगितली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली. यावेळी आरोपीने गुन्ह्यात वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे पोलिसही चक्रावले आहे. आरोपीवर आयटी ॲक्टच्या विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा प्रकारची घटना घडली असेल तर आजिबात घाबरु नका, गडचिरोली पोलीस तुमच्या सोबत आहे. तुम्ही समोर या शंभर टक्के अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं गडचिरोली अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितलं आहे.