युट्यूबवर पाहून बॉम्ब बनवणं महागात, निकामी करता न आल्यानं पोलिसांत धाव, तरुणाला बेड्या
नागपूरमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय मुलानं युट्यूब पाहून बॉम्ब तयार केला. परंतु, निकामी करता न आल्यानं त्याची पंचायत झाली. त्यानंतर त्यानं एक शक्कल लढवून पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी बॉम्ब पथक पाचारण करुन बॉम्ब निकामी केला आणि याप्रकरणी अधिक तपास सुरु केला. त्यावेळी तरुणानं हा प्रकार केल्याचं उघड झालं. नागपूर पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
नागपूर : सध्या सोशल मीडिया अनेकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अशातच लोकप्रिय व्हिडीओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या युट्यूबवर दररोज अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. अशातच युट्यूबवर पाहून बॉम्ब तयार करण्याचा प्रयोग नागपूरमधील एका तरुणाला चांगलाच महागात पडलाय. युट्यूबवर व्हिडीओ पाहून स्फोटकांचा वापर करत त्यानं एका बॉम्बची निर्मिती केली. परंतु, बॉम्ब तयार केल्यानंतर तो निकामी करणं त्याला काही जमेना. बॉम्ब निकामी करता आला नाही, त्यामुळे तरुणाची चांगलीच पंचाईत झाली आणि त्यानं थेट पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केलं. बॉम्ब शोधक पथकानं हा बॉम्ब निकामी केला. त्यानंतर मात्र या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नागपूरमध्ये राहणाऱ्या राहुल पगाडे या 25 वर्षीय मुलानं युट्यूब पाहून बॉम्ब तयार करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यानं त्यासंदर्भातील सर्व साहित्य गोळा केलं. त्यानंतर बॉम्बसाठी आवश्यक असणारा इलेक्ट्रिक सर्किट तयार करुन एका काचेच्या भांड्या स्फोटकाचा वापर करुन त्यानं बॉम्ब तयार केला आणि बॅगमध्ये ठेवला. पण त्यानंतर हा बॉम्ब निकामी कसा करावा हे काही त्याच्या लक्षात येईना. त्यानं त्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु, त्याला काही उपाय सापडेना. अखेर या तरुणानं एक शक्कल लढवली. नागपूरमधील केडीके टी पॉईंटजवळ ही बॅग ठेवली. काही वेळानं ही बॅग घेऊन तो नागपूरच्या नंदनवन पोलीस स्थानकात गेला आणि ही बॅग मला केडीके टी पॉईंट जवळ बेवारस आढळल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी ती बॅग ताब्यात घेऊन त्या बॅगची तपासणी करण्यास सुरुवात केली. या बॅगेत पोलिसांना इलेक्ट्रिक सर्किट आढळून आले. सोबतच मोबाईल बॅटरी, काही वायर्स चे तुकडे, एक लायटर, एक बल्ब आणि एक साधा कीपॅडचा मोबाईल अशा वस्तू आढळल्या. या बॅगेत एक कागदही आढळला. त्या कागदावर आय किल यू नागपूर केबीएमए असे लिहिलेले आढळल्याने पोलीस ही हादरले. नंदनवन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण केले. बॉम्ब शोधक पथकानं तपासणी केल्यानंतर त्यात कमी प्रतीचे स्फोटक (गावठी बॉम्ब सदृश) असल्याचे सांगितले. हा बॉम्ब बॉम्ब शोधक पथकानं निकामी केला.
पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी सुरु केली. त्यानंतर ज्या ठिकाणी बॅग बेवारसपणे आढळून आल्याचं सांगितलं होतं. त्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फोटेज पोलिसांनी तपासलं. त्यानंतर हा प्रकार तरुणानचं केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी राहुलची उलटतपासणी करत त्याला तत्काळ बेड्या ठोकल्या. बॉम्ब तयार करत पोलिसांची दिशाभूल करण्याच्या आरोपाखाली राहुल पगाडेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस आणखी तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :