Nashik Crime : नाशिकमध्ये पोलिसांचा धाकच राहिला नाही, भरवस्तीत गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद
Nashik Crime : नाशिक शहरातील क्राईम रेट दिवसेंदिवस वाढत असून यामुळे सामान्य नागरिक दहशतीखाली आहेत.
Nashik Crime : नाशिक (Nashik City) शहरातील क्राईम रेट दिवसेंदिवस (crime Rate) वाढत असून यामुळे सामान्य नागरिक दहशतीखाली आहेत. शहरातील फुलेनगर (Fulenagar) भाग गुन्हेगारांचा जणू अड्डाच बनला. दोन तीन दिवसांपूर्वी भरवस्तीत तरुणाचा खून (Youth Murder) झाल्याची घटना ताजी असताना काल सायंकाळच्या सुमारास घरात घुसून कुटुंबियांवर गोळीबारासह (Firing) कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरातील रहिवासी भीतीच्या सावटाखाली आहेत.
नाशिक शहरात (Nashik) रोजच खून, दरोडे, प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांना (Nashik Police) धाकच उरला नसल्याने अशा घटनांवरून वारंवार अधोरेखित होत आहे. नाशिक धार्मिक नगरी म्हणून ओळखली जाते. मात्र अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलिसांचा वचकच कमी झाल्याचे चित्र आहे. यामुळे इतर रहिवाशांना गुन्हेगारीशी तोंड देण्याची वेळ आली आहे. नाशिक शहरातील गजबजलेला परिसर असलेल्या फुलेनगर भागात जुन्या वादाच्या कुरापतीवरून थेट गोळीबार केल्याची घटना घडली आहे. येथूनच पंचवटी पोलीस ठाणे अगदी हाकेच्या अंतरावर असताना संशयितांना घरात घुसून संबंधित कुटुंबियांवर गोळीबार केला आहे. यात एक महिला जखमी झाली असून घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील पंचवटीत भागात असलेल्या फुलेनगर परिसरात जुन्या वादातून थेट एका घरात घुसून महिलेवर व तिच्या मुलावर कोयत्याने हल्ला करत गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारमध्ये महिलेच्या अंगाला गोळी चाटून गेल्याने ती जखमी झाली आहे. उषा महाले असे या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, ही संपूर्ण फायरिंगची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फुले नगर परिसारत दयानंद महाले यांचा मुलगा हा चौकात बसलेला होता. जुन्या भांडणाच्या कुरापतीवरून तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्यावर कोयत्याने हल्ला चढवला. यात त्याने प्रतिकार करत तेथून पळ काढत घर गाठले. मात्र संशयितांनी एवढ्यावर न थांबता थेट महाले यांच्या घरावर गोळीबार केला.
दरम्यान जाब विचारण्यासाठी आलेल्या उषा महाले यांच्या दिशेने देखील हल्लेखोरांनी बंदुकीतून फायरिंग केली. सुदैवाने उषा महाले यांच्या छाती जवळून गोळी चाटून गेल्याने त्या थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांनतर देखील हल्लेखोरांकडून गोळीबार सुरूच होता. या घटनेनंतर घटनास्थळावरून हल्लेखोर पसार झाले. हा संपूर्ण प्रकार परिसारत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तर रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. रात्री गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण फुले नगर परिसर हादरून गेला होता. मागच्या आठवड्यातच या भागात तीन जणांच्या टोळक्याकडून एका तरुणाची धारदार शस्त्राने भर रस्त्यात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर काल रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
नागरिक भीतीच्या सावटाखाली
नाशिकमध्ये (Nashik) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने (Crime) कळस गाठला असून प्राणघातक हल्ले, मारहाण, खंडणी वसुली, विनयभंग अशा घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे नाशिकची गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांसमोर गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आव्हानच उभे ठाकले आहे. रोज गुन्हेगारीच्या घटनांनी नाशिक शहरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याचे चित्र आहे. खरं तर धार्मिक नगरी, ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहराचे सामाजिक स्वास्थ सध्या बिघडले असून दिवसाढवळ्या सर्रास प्राणघातक हल्ले, मारहाण करण्याच्या घटना होत आहेत. या सर्व घटनांनी शहरात कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चॉपर, तलवा कोयत चाकू गावठी कट्टा याचा सर्रास वापर सुरू असल्याने सामान्य नागरिकांना परिसरात वावर करणे कठीण झाले आहे. यावर तातडीने पोलीस आयुक्तांनी पाऊल उचलणं गरजेचं असल्याचे दिसत आहे.