Nashik Crime : कधी गोळीबार, कधी प्राणघातक हल्ले तर कधी खंडणी वसुली, नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कळस
Nashik Crime : नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याचे चित्र आहे.
Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने (Crime) कळस गाठला असून प्राणघातक हल्ले, मारहाण, खंडणी वसुली, विनयभंग अशा घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे नाशिकची गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांसमोर गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आव्हानच उभे ठाकले आहे. रोज गुन्हेगारीच्या घटनांनी नाशिक शहरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याचे चित्र आहे.
नाशिकमध्ये सद्यस्थितीत कोयता गँगची (Koyata Gang) दहशत पाहायला मिळत असून मागील महिनाभरात कोयत्याने हल्ला झाल्याच्या दहापेक्षा अधिक घटना उघडकीस आल्या आहेत. अशातच सरकारवाडा पोलिसांनी कोयता हल्ल्याच्या घटनेतील संशयिताना ताब्यात घेतले आहे. यात वेदांत संजय चाळगे हा पहिला गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याच दरम्यान 11 फेब्रुवारीला पुन्हा दुसरा गुन्हा करून तो फरार झाला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी शहरातील ठक्कर बाजार जवळील किशोर सुधारालय समोरुन वेदांत संजय चाळगे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक धारदार कोयता हस्तगत केला.
दुसऱ्या घटनेत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील तपोवन परिसरात गावठी बनावटीचे पिस्टल व काडतुसे विक्री करण्यासाठी येणार समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत किरण रतन गुजर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, मॅगझीन व त्यातील एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. यावरून नाशिक शहरातील वाढते गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नवीन वर्षातही सातत्याने गुन्हेगारीच्या घटना या समोर येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
नाशिक पोलिसांकडून विविध पथकांची स्थापना करून कारवाया जरी केल्या जात असल्या तरी मात्र दुसरीकडे शहरातील गुन्हेगारीचा हा वाढता आलेख बघता गुन्हेगारांवर पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे. खरं तर धार्मिक नगरी, ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहराचे सामाजिक स्वास्थ सध्या बिघडले असून दिवसाढवळ्या सर्रास प्राणघातक हल्ले, मारहाण करण्याच्या घटना होत आहेत. या सर्व घटनांनी शहरात कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चॉपर, तलवा कोयत चाकू गावठी कट्टा याचा सर्रास वापर सुरू असल्याने सामान्य नागरिकांना परिसरात वावर करणे कठीण झाले आहे. यावर तातडीने नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी पाऊल उचलणं गरजेचं असल्याचे दिसत आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने कळस गाठलाय. विशेष म्हणजे पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये देखील कोयता गॅंगची दहशत बघायला मिळते असून गेल्या एकच महिन्यात शहरातील भद्रकाली, उपनगर, अंबड, गंगापूर अशा विविध भागात कोयत्याने हल्ल्या झाल्याच्या आठ घटना या समोर आल्या आहेत, भरवस्तीत सर्रासपणे कोयत्याने एकमेकांवर हल्ले चढवले जात आहेत. अंबड परिसरातील एका हार्डवेअर दुकानातुन पोलिसांनी 12 कोयतेही हस्तगत केले होते. याव्यतिरिक्त शहरात प्राणघातक हल्ल्याचे प्रकार घडत आहेत.