(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : सापाच्या तोंडात 'कान्हा'चा अंगठा; आई बाळासाठी झाली हिरकणी, मनमाडच्या हिंमतवान आईचं कौतुक
Nashik News : बाळाला सापाच्या तावडीतून सोडवत आईने बाळाचा जीव वाचविल्याची घटना मनमाडमध्ये समोर आली आहे.
Nashik News : आई आपल कुटुंब आणि मुलांसाठी नेहमीच जीवाचं रान करत असते. कोणत्याही संकटाला सामोरे जाऊन कुटुंबांचा आधार होत असते. आपल्या बाळासाठी तर तरीच दिवस एक करून त्याला जपत असते. काही क्षणांसाठी बाळ इकडचं तिकडं झालं, तरी आईचा जीव कासावीस होतो. मग अशावेळी कितीही मोठं संकट येऊ दे मात्र आई (Aai) धैर्याने तोंड देऊन बाळाचं रक्षण करते. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा नाशिकमध्ये (Nashik) समोर आला आहे. बाळाला सापाच्या तावडीतून सोडवत आईने बाळाचा जीव वाचविल्याची घटना समोर आली आहे.
'रात्रीची वेळ, घरात आई आणि तिचा दीड वर्षाचा कान्हा झोपलेला होता. रात्री अचानक कान्हा रडायला लागला. आईला जाग आली पाहते तर बाळाच्या अंगठा तोंडात पकडलेल्या अवस्थेत विषारी मण्यार पहुडलेला होता. याचवेळी आईच्या पायाखालची जमीनच सरकली. काही क्षणांत तिने बाळाला सापाच्या (Snake) तावडीतून सोडवत घराबाहेर पळ काढला. मात्र सापाने दंश केलाच होता. कान्हाला तातडीने मनमाड नंतर नाशिकला (Nashik hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. तब्बल 48 तास कान्हाची मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर बाळ सुखरूप आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळील (Manmad) वंजारवाडी येथील पवार कुटुंबियांच्या घरात ही गोष्ट घडली असून पूजा पवार (Pooja Pawar) असे हिंमतवान आईचे नाव आहे. यादव कारभारी पवार हे मनमाड जवळील वंजारवाडी येथील शेतात वास्तव्यास आहेत. मुलगा योगेश आणि सून पूजा या दाम्पत्यास कान्हा हा दीड वर्षांचा मुलगा आहे. रात्री झोपेत असताना अचानक मण्यार या विषारी सापाने दंश केला. एकीकडे डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न तर दुसरीकडे कुटुंबाने केलेला देवाचा धावा कामी आला, अन् त्या कोवळ्या जिवाने मृत्यूशी लढाई जिंकली. मरणाच्या दारातून परत आलेल्या 'कान्हा पवार' या चिमुकल्याची चर्चा सध्या जिल्हाभरात होत आहे.
काय घडलं नेमकं?
बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक कान्हा मोठ्याने ओरडून रडू लागला. आई पूजाला कान्हाचा उजव्या हाताचा अंगठा सापाच्या तोंडात असल्याचे दिसले. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने वेळ न दवडता लागलीच मुलाचा अंगठा सापाच्या तावडीतून सोडविला. मुलाला बाहेर घेऊन पळाली. तिच्या ओरडण्याने घरातील इतर कुटुंबियांनी देखील झोप उडाली. घरातल्या सदस्यांनी देखील घराबाहेर पळ काढला. पहिल्यांदा आई पूजासह तिच्या घरच्यांनी कान्हाला मनमाडला उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तात्काळ मालेगावला हलविण्यात आले. मात्र येथेही काही काळ उपचार केल्यानंतर कान्हाची शुद्ध हरपत असल्याने लक्षात येताच त्यास नाशिक येथील साफल्य बालरुग्णालयात नेले. येथील डॉ. अभिजित सांगळे यांनी अँटी स्नेक बाईटचे सत्तावीस डोस दिल्यावर 48 तासांनी कान्हा शुद्धीवर आला.
इतर महत्वाच्या बातम्या :