RTO Nagpur : बनावट नोंदणीवर धावताहेत शेकडो ट्रक; रायपूर पोलिसांकडून नागपुरातील ट्रान्स्पोर्टरला अटक
रायपूर पोलिसांनी उत्तर नागपुरातील एका ट्रान्स्पोर्टरला अटक केली, मात्र वास्तवात तो केवळ एक 'प्यादा' आहे. या खेळामागचे खरे खेळाडू दुसरेच असल्याची माहिती आहे.
Nagpur News : बनावट नोंदणी क्रमांकाच्या (Fake registration number) आधारावर शहरातील रस्त्यांवरुन शेकडो ट्रक धावत असल्याची खळबळजनक माहिती छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन समोर आली आहे. मात्र ना आरटीओला (प्रादेशिक परिवहन विभाग) काही चिंता आहे आणि ना पोलीस विभागाला. शहरातील 10 हून अधिक ट्रान्स्पोर्टर बनावट नोंदणीवरच त्यांचे वाहन चालवून लाखो रुपयांचा नफा कमवत असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच रायपूर पोलिसांनी उत्तर नागपुरातील एका ट्रान्स्पोर्टरला अटक केली, मात्र वास्तवात तो केवळ एक 'प्यादा' आहे. या खेळामागचे खरे खेळाडू दुसरेच आहेत. या प्याद्याने सर्व दोष स्वत:वर घेतल्याने ते सध्या सुखरुप आहेत. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास अनेक ट्रान्स्पोर्टरना दणका बसू शकतो.
आंतरराज्यीय (interstate) असलेल्या या टोळीत केवळ नागपूरच (Nagpur) नाहीतर छत्तीसगड Chhattisgarh, बिहार (Bihar) आणि नागालँडचे व्यवसायी आणि दलालांचा समावेश आहे. इंजिन, चेसिस आणि नोंदणी क्रमांक बदलण्याचे सर्व काम उत्तर-पूर्वमध्ये होते. कवडीमोल भावात ही टोळी लहान ट्रान्स्पोर्टर्सचे ट्रक लीजवर घेते. काही महिन्यांपर्यंत ट्रक मालकांना सुरळीत भाडे दिले जाते. नंतर ट्रक चोरी गेल्याचा बनाव केला जातो. काही दिवस वाहन अज्ञात ठिकाणी लपवून ठेवल्या जाते. या दरम्यान डायच्या माध्यमातून ट्रकचे चेचिस आणि इंजिन क्रमांक बदलले जाते. दलाल बनावट कागदपत्र तयार करुन नागालँडच्या आरटीओतून (RTO) ट्रकची पासिंग करुन घेतो. त्यानंतर हेच ट्रक अधिक किंमतीत देशातील विविध राज्यांमध्ये विकल्या जातात.
काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात रायपूर पोलिसांनी चरणजित सिंग उर्फ बिट्टू सरदार रा. अशोकनगर, पाचपावलीला अटक केली होती. मात्र बिट्टूच्या डोक्यावर काके सरदारचा हात असल्याची माहिती मिळाली आहे. वास्तवात बिट्टू हा दलालीचे काम करायचा, वाहनांचा सौदा करण्याचे काम काके करतो. नागपूरच्या जवळपास 10 ट्रान्स्पोर्टर्सकडे नागालँडची अनेक वाहने आहेत, जी वेगवेगळ्या मार्गांनी धावतात. यातील 90 टक्के वाहन बनावट कागदपत्रांद्वारे नागालँड आरटीओतून पासिंग करुन घेण्यात आले आहेत. केवळ नागपुरातच असे 300 हून अधिक वाहन असल्याची माहिती मिळाली आहे. जर पोलिसांनी या वाहनांचा तपास केला तर अनेक ट्रान्स्पोर्टरचे पित्तळ उघडे पडेल. बिट्टू आणि काके यांनी आसपासच्या राज्यांमध्येही वाहन विकले आहेत.
शहरातही सक्रिय आहे टोळी
नागपूर शहरातच अशाप्रकारची टोळी चालवणारे अनेक लोक सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी यंग फोर्स ऑर्गनायजेशनचा भंडाफोड केला, मात्र असे अनेक ग्रुप शहरात सक्रिय आहेत. सतीश अण्णा यानेही करीम लाला सोबत मिळून एक टोळी तयार केली. खासगी कॅब कंपन्यांमध्ये परमिट वाहन चालक सतत तोट्यात गेले. त्यांना कर्जाचे हफ्ते भरणेही कठीण झाले. या टोळीनेही बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करुन कवडीमोल भावात टॅक्सी वाहन खरेदी केले. नागपूर, यवतमाळ, बीडसह इतर आरटीओमध्ये कर न भरताच वाहनांची खासगी नोंदणी करुन घेतली. ऑटोडीलर्सच्या माध्यमातून हे वाहन लोकांना विकण्यात आले. या कामात अमन, सलमान, सौदागर, मगाडे, मोहसीन आणि अहिरराव बंधूंचा समावेश आहे. या लोकांनी बनावटरित्या लाखो रुपये कमावले आहेत.
300 वाहन काळ्या यादीत, मात्र एकावरही कारवाई नाही
जवळपास वर्षभरापूर्वी आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या गैरप्रकाराची माहिती मिळाली. त्यानंतर नागपूरसह संपूर्ण विदर्भात 300 हून अधिक वाहने काळ्या यादीत टाकण्यात आली. परंतु, बोगस पद्धतीने वाहनांची नोंदणी करुन घेणारे दलाल, वाहन विक्रेते आणि आरटीओच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. यावरुन या 'व्हाईट कॉलर' गुन्हेगारांबाबत प्रशासन किती गंभीर आहे, हे दिसून येते.
ही बातमी देखील वाचा