एक्स्प्लोर
पाचवेळा विविध पदांचा राजीनामा देऊनही कामतांनी काँग्रेस का नाही सोडली?
हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 63 व्या वर्षीच कामत यांची प्राणज्योत मालवली. माजी केंद्रीय मंत्री, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी आपल्या कारकीर्दीत भूषवली.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते गुरुदास कामत काल संध्याकाळपर्यंत आपल्या कामांमध्ये, बैठकीमध्ये व्यस्त असणारा नेता असा अचानक निघून गेला. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 63 व्या वर्षीच त्यांची प्राणज्योत मालवली. माजी केंद्रीय मंत्री, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी आपल्या कारकीर्दीत भूषवली.
अखेरच्या क्षणापर्यंत पक्षाचं काम
दिल्लीतल्या वसंत एनक्लेव्हमध्ये गुरुदास कामत राहत होते. काल पक्षाच्या कामासाठी ते दिल्लीत आले होते. 2017 लाच मुंबई काँग्रेसमधल्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी सगळ्या पदांचा राजीनामा दिला होता. पण तरीही काँग्रेसमधली त्यांची मुळं घट्ट होती. त्यामुळेच 2019 च्या तोंडावर लोकसभा लढवून ते पुन्हा पक्षात सक्रिय होतील अशी चिन्ह दिसत होती. काल अहमद पटेल यांची खजिनदारपदी नियुक्ती झाल्यानंतर कामत यांनी त्यांचे अभिनंदन केले. कालच महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतही बैठक केली.
वसंत एंक्लेवमधल्या घरी सकाळी सातच्या सुमारास गुरुदास कामत यांनी चहा घेतला. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखायला लागलं. त्यावेळी त्यांच्यासोबत बंगल्यावर जुना स्टाफ होता. त्यांनी उपचारासाठी प्रायमस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या आधीच त्यांनी श्वास सोडला होता.
संपूर्ण कारकीर्दीत संघर्ष
गुरुदास कामत हे मूळचे कर्नाटकच्या कारवार या मराठी प्रांतातले. पण वडील प्रीमियर कंपनीत कामाला असल्याने बराच काळ ते मुंबईतच राहिले. 1984 साली ते मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर पाच वेळा खासदार झाले. यूपीएच्या कार्यकाळात 2009 ते 2011 या काळात त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. पण 2011 मध्ये अचानक त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. याचं कारण होतं मुंबई काँग्रेसमधले त्यांचे प्रतिस्पर्धी देवरा कुटुंबीय यांचं वाढत चाललेलं वर्चस्व.
कामत यांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत हा संघर्ष त्यांना चुकला नाही. कुशल संघटक, उत्तम जनसंपर्क असलेला नेता अशी त्यांची ओळख असली, तरी संघटनेत प्रत्येक टप्प्यावर त्यांचा संघर्ष कायम राहिला.
मुंबई काँग्रेसमध्ये आधी देवरा कुटुंबीय आणि आता विद्यमान मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत त्यांचं कधी पटलं नाही. त्यामुळेच 2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
गुरुदास कामत हे नव्वदीच्या दशकात युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते. तेव्हाही ऑस्कर फर्नांडिस, आनंद शर्मा यांच्याशी त्यांचं पटत नव्हतं. तेव्हाही त्यांनी अशाच पद्धतीने तडकाफडकी राजीनामा दिला होता. निरुपम यांच्याशी वाद झाल्यानंतर 2017 मध्ये दिलेला त्यांचा राजीनामा तर अवघे पंधरा दिवस टिकला, त्यानंतर ते पुन्हा पक्ष कामात लागले.
मुंबई काँग्रेसचे अँग्री मॅन
मुळात एखादी गोष्ट पटली नाही, की ती तिथल्या तिथे बोलून दाखवायची हा कामतांचा स्वभाव. त्यामुळे गुरुदास कामत यांची ओळख मुंबई काँग्रेसचे अँग्री मॅन अशी होती. अर्थात काँग्रेस पक्की भिनली असल्याने त्यांनी पक्ष मात्र कधी सोडला नाही. आज त्यांच्या निधनानंतर सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद या दिग्गज काँग्रेस नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये भेट दिली.
राजकारणात अनेकांना 63 व्या वर्षी मोठं पद मिळायला सुरुवात होते, तिथे कामत त्यांच्या आयुष्याचा दोर मात्र इथेच तुटला. आयुष्यभर त्यांच्या राजकारणात जो संघर्ष सुरू होता, तो शेवटी मृत्यूनेच थांबवला.
संबंधित बातम्या :
विद्यार्थी चळवळ ते केंद्रीय मंत्री, गुरुदास कामत यांचा प्रवास
काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांचं निधन
काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचं अखेरचं ट्वीट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement