एसएफआयचे संस्थापक राज्य अध्यक्ष प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे सर यांचे दुःखद निधन
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (SFI) संस्थापक राज्य अध्यक्ष प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे सर यांचे आज दुःखद निधन झाले.

मुंबई : एसएफआयचे (SFI) संस्थापक राज्य अध्यक्ष प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चळवळीला सतत दिशा देणारे मार्गदर्शक आपण गमावले असल्याची भावना SFI महाराष्ट्र राज्य कमिटीने व्यक्त केली आहे. कोणत्याही परिस्थितीत ते नेहमी आपल्याला चांगल्या सूचना करत असत. मोरे सरांचे निधन अत्यंत दुःखदायक आणि धक्कादायक आहे. कारण नुकतेच 5 सप्टेंबरला मोरे सरांचे सहकारी कॉ. उद्धव भवलकर यांचेही निधन झाले. त्याआधी जूनमध्ये त्यांचे दुसरे सहकारी प्रा. कॉ. अरुण शेळके यांचे निधन झाले. मोरे सर, शेळके सर आणि कॉ. भवलकर यांनी सोबतच एसएफआयची सुरुवात केली.
1970 साली मोरे सर यांनी तिरुअनंतपुरम येथे झालेल्या एसएफआयच्या स्थापना अधिवेशनात महाराष्ट्रातील प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. तेथून परत आल्यावर मराठवाड्यात विद्यार्थ्यांना संघटित करून जबरदस्त आंदोलन उभारले. मराठवाडा विकास आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. 1975 साली उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे झालेल्या महाराष्ट्र एसएफआयच्या पहिल्या राज्य अधिवेशनात ते पहिले राज्य अध्यक्ष म्हणून निवडले गेले. आणि त्यानंतर त्यांनी एसएफआयला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनात घर करून दिले. त्यांच्याच प्रयत्नातून आणि सहकार्यातून 9 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत आदर्श विद्यालयामध्ये एसएफआयच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आजी-माजी कार्यकर्त्यांचा मेळावा यशस्वी झाला. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेच होते. ते डीवायएफआय या आपल्या भतृभावी युवक संघटनेचे देखील संस्थापक राज्य अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी प्राध्यापक संघटना आणि अखिल भारतीय किसान सभेचे कार्य केले.
वाशी येथील महाविद्यालयात प्राध्यापक आणि रेणापूर व किल्लारी येथील महाविद्यालयात ते प्राचार्य होते. हा सर्व व्याप त्यांच्यामागे असताना त्यांनी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे शहीद भगतसिंग महाविद्यालय स्थापन केले. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट व व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य होते. तसेच राज्यशास्त्र विभाग अभ्यासक्रम मंडळावर देखील ते होते. त्यांनी विद्यार्थी दशेपासून सुरू केलेले कार्य आजतागायत सुरूच आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने आपले खूप नुकसान झाले आहे. एक अभ्यासू व चिकित्सक मार्गदर्शक, लढाऊ नेते, पुरोगामी, मार्क्सवादी, धर्मनिरपेक्ष विचारवंत आपण गमावला असल्याची भावना SFI महाराष्ट्र राज्य कमिटीने व्यक्त केली.
एसएफआयच्या मागील 50 वर्षाच्या वाटचालीत मोरे सरांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या कार्याला आम्ही कायम स्मरणात ठेवू. मोरे सर यांच्या निधनाबद्दल एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटी शोक व्यक्त करते आणि मोरे कुटुंबियांच्या दुःखात पूर्णपणे सहभागी होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
