Washim News : वाशिम जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; जिल्हाधिकाऱ्यांची नवी माहिती, म्हणाले, गेल्या 24 तासात....
Bird Flu in Washim : वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जीरापुरे इथल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे समोर आले होते. आता या बाबतची अधिक माहिती अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिलीय.

Washim News : वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जीरापुरे इथल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा (Bird Flu) शिरकाव झाल्याचे समोर आले होते. इथल्या एका पोल्ट्री फार्ममधील कोंबड्याना बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर वाशिम जिल्हा प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करत बर्ड फ्लू बाधित सर्व कोंबड्यां आणि खाद्य शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट केल्या आहेत. परिणामी या सर्व परिस्थितीवर प्रशासनानं नियंत्रण मिळवलं असून, मागील 24 तासात वाशिम जिल्ह्यात इतरत्र कुठेही बर्ड फ्लूची साथ झाल्याची नवीन घटना उघडकीस आली नसल्या माहिती पुढे आली आहे. या बाबतची माहिती वाशिमचे अप्पर जिल्हाधिकारी रामेश्वर घुगे यांनी दिलीये.
दरम्यान, प्रशासनाकडून तालुका स्तरावर समिता गठित करून सर्व पोल्ट्री फार्मवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तथापि नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय.
विविध गावांमध्ये बर्ड फ्लू विषयी जनजागरण दवंडी
वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजाच्या खेर्डा भागातील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची बाधा आढळून आली आहे. यातील मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यात संसर्गाची पुष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बर्ड फ्लूविषयी जनजागरण करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये दवंडी देऊन बर्ड फ्लू विषयी माहिती नागरिकांना दिली जात आहे. तसेच सतर्कता बाळगण्याचे उपायही या दवंडीद्वारे सांगितले जात आहेत.
7500 कोंबड्या बर्ड फ्लू आजाराने दगवल्या, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जीरापुरे येथील दिगंबर गुल्हाने गेल्या 10 वर्षा पासून कुक्कुटपालचा व्यवसाय करतात. मात्र, 20 फेब्रुवारी पासून कोंबड्या मृत होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, या घटनेसंबंधी माहिती मिळताच पशुचिकित्सा विभागाने आपलं कार्य करत मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी बाहेरगावी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यातून संबंधित कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू आजाराने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुल्हाने यांनी पोषण केलेल्या सुमारे 7500 कोंबड्या बर्ड फ्लू आजाराने दगवल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















