प्रशांत दामलेंना पद्म पुरस्कार देण्याची मागणी; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणाले, आम्ही आधीच...
प्रशांत दामले यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.दामले यांना पद्म पुरस्कार देण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
CM eknath shinde on prashant damle : अभिनेते प्रशांत दामले यांच्या 12 हजार 500 व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दामले यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार देण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला असल्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, मराठी नाट्य, चित्रपटसृष्टी जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. नाट्यसृष्टीत नाटकांचे तब्बल 12 हजार 500 प्रयोग अभिनेते प्रशांत दामले यांनी केले, ही राज्याच्यादृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी दामले यांचे अभिनंदन केले. प्रशांत दामले यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली, त्याला उत्तर देतांना प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार देण्याबाबतचा शिफारशीचा प्रस्ताव मागणी करण्याअगोदरच केंद्र सरकारला पाठवला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रशांत दामले यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, मराठी नाटक हे मराठी प्रेक्षकांसाठी मनातलं आहे. त्यामुळे नाट्यगृह सुस्थितीत असावीत. नाट्यगृह चांगले बनतात पण पुढे ते मेंटेन केले जात नाहीत. महापालिका कुठलीही असो महापालिकेचे अधिकारी नाट्यगृह आणि बगीचांकडे इन्कम सोर्स म्हणून पाहतात हे चुकीचं आहे. हे लोकांच्या स्वास्थ्यासाठी आहे, त्यामुळे हे मेंटेनन्स करण्यासाठी काहीतरी वेगळे नियोजन करणे गरजेचे आहे, असं प्रशांत दामलेंनी म्हटलं.
राज्यातील नाट्यगृहांची दुरुस्ती करणार
राज्यातील नाट्यगृहाची स्थिती सुधारण्यासाठी त्या नाट्यगृहांची दुरूस्ती करण्याबाबत यापूर्वी बैठक घेवून निर्देश दिले आहेत. खराब स्थितीतील नाट्यगृहांच्या पाहणीसाठी एक नोडल अधिकारी नेमला जाईल आणि त्या नाट्यगृहांची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुंबई- ठाण्यामध्ये नवीन चित्रनगरी
कलावंताना मोठं व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये चित्रनगरी उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. त्यामुळे कलाकारांना मोठं व्यासपीठ उपलब्ध होईल. कलेला वाव देण्यासाठी कलाकारांच्या पाठिशी आहोत असं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
ही बातमी देखील वाचा