(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोलिसांना उपचार मिळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून कोविड सेंटरची उभारणी
कोरोना झालेल्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबाला योग्य ते उपचार मिळावेत यासाठी नवी मुंबई पोलीस मुख्यालयात कोविड सेंटरची उभारणी केली आहे.
नवी मुंबई : राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. पोलिसांबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाने गाठले आहे. कोरोनामुळे अनेक पोलिसांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोरोना झालेल्या पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबाला योग्य ते उपचार मिळावेत यासाठी नवी मुंबई पोलीस मुख्यालयात कोविड सेंटरची उभारणी केली आहे. नेरुळ आणि कळंबोली येथे उभारलेल्या 'निवारा' कोविड सेंटरची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाहणी केली.
एकूण 125 बेडचे कोविड रुग्णालय फक्त पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी उभारण्यात आले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस कोरोना रुग्णालय उभारण्याचे आदेश दिल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितलं. पोलीस यंत्रणावरील खर्चात कुठेही आखडता हात घेणार नसून ज्या पोलिसांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या घरातील व्यक्तीला खात्यात नोकरी देणार असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.
आज कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात #Covid19 च्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्यांकरता नव्याने उभारण्यात आलेल्या निवारा कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करून पाहणी केली. यावेळी पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/N7muGCkvsg
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 10, 2020
कोरोना योद्धेच विळख्यात कोरोना व्हायरसविरुद्ध फ्रण्ट लाईनवर लढणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोनाची सर्वाधिक लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील 190 पोलीस अधिकारी आणि 1269 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत राज्यातील 34 पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक बळी मुंबईतील आहे. दरम्यान पोलिसांना काही लक्षणे दिसून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावे यासाठी राज्यात सगळीकडे नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.