काळजी घ्या... मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती! केंद्रीय पथकाकडून सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठिकाणी पाहणी
केंद्रीय पथकाकडून आज गोवरचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या एम-पूर्व विभागात जात ठिकठिकाणी पाहणी करण्यात आली.उद्या देखील केंद्रीय पथकाकडून गोवरचा उद्रेक असलेल्या विभागात जात पाहाणी आणि आढावा घेतला जाणार आहे.
Measles Outbreak in Mumbai : मुंबईकरांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. कारण मुंबईमध्ये गोवर रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचं समोर आल्यानंतर केंद्राकडून देखील दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय पथकाकडून आज गोवरचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या एम-पूर्व विभागात जात ठिकठिकाणी पाहणी करण्यात आली. उद्या देखील केंद्रीय पथकाकडून गोवरचा उद्रेक असलेल्या विभागात जात पाहाणी आणि आढावा घेतला जाणार आहे.
मागील दोन महिन्यात गोवरचे 84 रुग्ण समोर आले आहेत. महापालिकेकडून गोवरचा उद्रेक झालेल्या विभागात विविध उपाययोजनेला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जात गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत असून संशयित रुग्णांना जीवनसत्व अ देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास संशयित रुग्णांना पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं जातंय. 9 महिने आणि 16 महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाची अतिरिक्त सत्रांचे आयोजन करण्यात आलं आहे तसेच बालकांची तपासणी केली जात आहे. खासगी डाॅक्टरांना गोवर आजार तसेच लसीकरणाबाबत सांगितलं जात आहे.
वयोगटानुसार गोवरच्या 2022 सालात मुंबईत किती रुग्णसंख्या
एकूण - 109
0-1 वर्षे - 27 रुग्ण
1-2 वर्षे - 22 रुग्ण
2-5 वर्षे - 33 रुग्ण
5 वर्षांवरील - 27 रुग्ण
मुंबईतील एकूण संशयित रुग्ण - 617 रुग्ण
गोवर हा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक संसर्ग असल्याचे सिद्ध होऊ शकतो, असं तज्ञांचं म्हणणं आहे. याची चार प्रमुख लक्षणे 7 ते 14 दिवसांत दिसतात. यात 104 अंशांपर्यंत उच्च ताप, खोकला, वाहती सर्दी, लाल डोळे किंवा पाणीदार डोळे होणे. गोवरची सुरुवातीची लक्षणे दिसतात तेव्हा 2 ते 3 दिवसांनंतर तोंडात लहान पांढरे डाग तयार होतात. त्याच वेळी, 3 ते 5 दिवसात शरीरावर लाल-चपटे पुरळ दिसू लागतात. गोवरची पुरळ मुलाच्या चेहऱ्यावर, मानेवर, हातांवर, पायांवर आणि तळव्यांना येऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात.
डॉक्टर काय सांगतात...
वैद्यकीय अधिकारी डॉ रेवत कानिंदे सांगतात की, गोवर टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण करणे. गोवरपासून संरक्षणासाठी मूल लहान असतांना गोवर लसीचे 2 डोज दिले जातात. लस घेतलेल्या मुला मुलींमध्ये गोवर होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे आहे.गोवर झाल्यानंतर केवळ त्याची लक्षणे नियंत्रित करून उपचार केले जातात. गोवरची लक्षणे मुला- मुलीं मध्ये आढळल्यास डॉक्टरांच्या सल्यानुसार उपचार करा.संक्रमित मुलाजवळ दुसऱ्या मुला मुलीने जाणे टाळावे. पाणी आणि फळांचा रस पिण्यास द्या. आपल्या स्वच्छतेची काळजी घ्या. बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवा, असं डॉ कानिंदे यांनी सांगितलं.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )