(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विनायक मेटेंच्या अपघातानंतर परिवहन विभाग सतर्क; सर्व आमदारांच्या वाहन चालकांना प्रशिक्षण
परिवहन विभागाच्या (Transport department) पुढाकाराने सर्व आमदारांच्या वाहन चालकांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती आहे.
Maharashtra News : माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघातानंतर सर्व आमदारांच्या (MLA Driver) वाहन चालकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. परिवहन विभागाच्या (Parivahan Vibhag) पुढाकाराने सर्व आमदारांच्या वाहन चालकांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती आहे. बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (Yashvantrao Chavan Pratishthan) येथे सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या चालकावर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे.
विनायक मेटे यांच्या अपघातानंतर राज्यातील नेत्यांनी रात्रीचा प्रवास टाळण्याबाबत भाष्य केलं होतं. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी रात्रीचा प्रवास टाळण्यासंदर्भात मत व्यक्त केलं होतं. लांब पल्ल्याचा प्रवास करताना चालकांना डुलकी येऊन अपघात घडू शकतात.
मेटे यांच्या अपघातानंतर आता सरकार देखील सतर्क झालं आहे. अनेक आमदार अधिवेशनासाठी किंवा मंत्रालयात येण्यासाठी आपल्या गाडीने मुंबईकडे येतात. यातही रात्रीच्या वेळी प्रवास करत येऊन सकाळी मुंबई गाठली जाते. मात्र असा रात्रीच्या वेळेचा प्रवास जीवघेणा ठरु शकतो. यामुळं सरकारनं आता आमदारांच्या चालकांना याबाबत प्रशिक्षण देण्याचं ठरवलं आहे.
मेटे यांच्या अपघातासंदर्भात आज विधानसभेत चर्चा
मेटे यांच्या अपघाताच्या बाबतीत आज विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, या घटनेत चालकाचा अंदाज चुकल्याने विनायक मेटे यांचा अपघात झाला. मेटे यांचा जागीच मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती दिली. ड्रायव्हरच्या बदलत्या जबाबामुळे संशयाला वाव असल्याचंही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे. मेटे यांच्या अपघातासंदर्भात आज विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठ पदरी करणं गरजेचं असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील कालबाह्य यंत्रणेसंदर्भात भाष्य केलं.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर इंटेलिजन्ट ट्रॅफिक सिस्टीम
आता मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर इंटेलिजन्ट ट्रॅफिक सिस्टीम लावण्यात येणार असल्याची माहिती आज विधानसभेत उपमुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे सॅटेलाईट आणि ड्रोनच्या माध्यमातून या मार्गावर लक्ष ठेवणं शक्य होणार आहे. तसंच ट्रेलर लेन सोडून चालत असेल तर माहिती मिळेल, असे फडणवीस यांनी म्हटलं आहे. मेटे यांच्या चालकाच्या बदलत्या जबाबामुळे संशयाला वाव असल्याचंही फडणवीस यांनी निवेदनात सांगितलं. मेटे अपघातप्रकरणी कुणाचीही थोडी चूक आढळली तर त्याला सोडणार नाही असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिलाय.
इतर महत्वाच्या बातम्या
'...यामुळे मेटेंच्या गाडीला अपघात', उपमुख्यमंत्री फडणवीसांचं निवेदन; अजित पवार म्हणाले..