Coronavirus | कोरोना चाचणीबाबत मुंबई महापालिका आयुक्तांचे नवे निर्देश
कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास थेट रुग्णाला दूरध्वनी किंवा मेसेज करुन कळवू नये, तर त्या बाधित रुग्णांची यादी तातडीने महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे पाठवावी, असे नव्या निर्देशात म्हटलं आहे.
मुंबई : कोरोना बाधिताची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर करायच्या कार्यवाहीमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नवीन निर्देश दिले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत. वैद्यकीय प्रयोगशाळांनी (लॅब) कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर थेट व परस्पर रुग्णास दूरध्वनी किंवा मेसेज करुन कळवू नये, तर त्या बाधित रुग्णांची यादी तातडीने महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे पाठवावी, असे नव्या निर्देशात म्हटलं आहे.
आरोग्य खात्याने त्यातून प्रशासकीय विभागनिहाय रुग्णांची नांवे संबंधित विभाग कार्यालयांना तातडीने पुरवावीत. विभाग कार्यालयांमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तृतीय व चतुर्थ वर्षाच्या आंतरवासितांचे (इंटर्न) पथक नेमावे. या पथकाने संबंधित बाधित रुग्णाशी संपर्क साधून त्यांच्याशी योग्य चर्चा करावी. त्यांची माहिती घ्यावी व त्यांना आवश्यक त्या रुग्णालय अथवा केंद्रामध्ये नेण्यासाठी समन्वय साधावा, अशी सूचना आयुक्त इकबाल चहल यांनी केलीय. त्यानुसार सुसूत्रता आणण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत सर्व कार्यवाही करावी, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या.
Lockdown 5.0 | देशभरात लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, ल़ॉकडाऊन कंटेनमेंट झोनपुरता मर्यादित
रुग्णालये किंवा वैद्यकीय तज्ज्ञांनी तातडीच्या प्रकरणांमध्ये कोरोना चाचणी करावयाची सांगितली असल्यास, त्या प्रकरणांत वैद्यकीय प्रयोगशाळांना थेट रुग्णालयास चाचणीचा अहवाल कळवता येईल, असेही आयुक्तांनी निर्देश दिले. प्रयोगशाळांकडून पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेकदा रुग्ण गोंधळून जातात किंवा महानगरपालिकेकडून रुग्णाशी संपर्क होण्याआधीच घाबरुन जाऊन रुग्णालयांची शोधाशोध करु लागतात. त्यातून इतरांना बाधा होण्याची शक्यता असते. हा गोंधळ व धावपळ टाळता यावी, त्यांना दिलासा देता यावा यासाठी ही सुसूत्र पद्धत आता अवलंबली जाणार आहे.