Covid Center Scam: कोविड सेंटर घोटाळा: बनावट डॉक्टरांच्या नावावर 22 कोटी रुपये हस्तांतरित? ईडीचा संशय बळावला
BMC Covid Center Scam: मुंबई कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात बनावट डॉक्टरांच्या नावाने मुंबई महापालिकेच्या नावाने वसुली करण्यात आला असल्याचा संशय ईडीला आहे.
BMC Covid Center Scam: कथित कोविड सेंटर घोटाळा (Covid Scam) प्रकरणात तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनायाच्या (ईडी) पथकाला तपासात काही नवीन बाबी आढळून आल्या आहेत. या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा ईडीचा संशय बळावला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महामारीच्या काळात दहिसर येथील कोविड-19 फील्ड हॉस्पिटलचे व्यवस्थापन करण्यासाठी बीएमसीने संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्ती असलेले सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विस लिमिटेड फर्मला 30 कोटी रुपये दिले होते. त्यात व्यवस्थापनच्या कामासाठी फक्त 8 कोटी रुपये वापरले असल्याचे ईडीला आढळून आले आहे.
मुंबई महापालिकेने सुजित पाटकर यांना दिलेल्या 30 कोटीपैकी आता उर्वरीत 22 कोटी रुपये कुठे हस्तांतरीत करण्यात आले, याचा ईडीकडून तपास सुरू आहे. चौकशी दरम्यान हे 22 कोटी रुपये संशयास्पद असलेल्या वेगवेगळ्या संस्थांकडे वळवण्यात आले असल्याचे ईडीला आढळून आले आहे. ईडीच्या कोविड सेंटर घोटाळ्याच्या तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, सुमारे 22 कोटी रुपये कोविडशी संबंधित कोणत्याही कामासाठी वापरले गेले नाहीत. मात्र, कधीही अस्तित्वात नसलेल्या डॉक्टरांच्या बनावट यादीच्या नावावर बीएमसीकडून रक्कम वसूल केली असल्याचे आढळून आले आहे. तसेच या आरोपींनी बीएमसीकडून बिल मंजूर करून घेण्यासाठी बनावट रुग्ण्याच्या नावाचा वापर करण्यात आला का, याचा तपासही ईडी करत आहेत.
ईडी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, LHMS व्यवस्थापनाने अंदाजे 150 हून अधिक डॉक्टरांसाठी बनावट रक्कम आणि प्रमाणपत्रे सादर केली होती. या यादीची संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य पडताळणी केली नाही. शिवाय, काही डॉक्टरांनी कोविड-19 केंद्रात केवळ दोन-तीन महिने काम केल्याचे आढळून आले आहे.
मनी लाँड्रिंगचा तपास करत असलेले ईडी अधिकारी सूरज चव्हाणनंतर आता त्यांच्या भावाच्या खासगी कंपन्यांची चौकशी करत आहेत. चव्हाण यांच्या भावाच्या नावावर एकूण तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. कोविड काळात या विविध कंपनी सोबत कुठलाही व्यवहार झाला होता का हे पाहण्यासाठी ईडीचे अधिकारी कागदपत्रे आणि इतर व्यवहारचा तपशील तपासत आहेत. सूरज चव्हाण किंवा त्यांच्या भावाच्या या कंपन्यांना कोणते टेंडर दिला होते का किंवा या संबंधित कंपनीच्या बँक खात्यावर पैसे वळवण्यात आले आहेत का हे सुद्धा तपासलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुरज चव्हाण यांनी खरेदी केलेले फ्लॅट्स हे कोविड काळातच खरेदी केले आहेत का? या फ्लॅट्सचा पैसा आणि मनी लॉंड्रिगने वळवले गेलेले 22 कोटी रुपये यांचा थेट संबंध आहे का? याचाही तपास ईडी करत आहे. ईडीचा हाच तपास आता सूरज चव्हाण यांच्या भावापर्यंत पोहचला आहे. ईडीने सूरज चव्हाण यांना चौकशी दरम्यान फ्लॅट्स खरेदीच्या अनुषंगाने प्रश्न केले होते. मात्र, चव्हाण यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचे ईडीच्या सूत्रांनी म्हटले.