Todays Headline 29 october : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
किशोरी पेडणेकर यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी
कथित एसआरए घोटाळा प्रकरणी काल शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. आज सकाळी 11 वाजता पुन्हा त्यांना दादर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असून आज सकाळी 10.30 वाजता किशोरी पेडणेकर यांची पत्रकार परिषद होणार आहे
मुख्यमंत्री नंदूरबारच्या दौऱ्यावर
शिंदे गटाचा पहिला मेळावा आज नंदूरबार येथे होणार आहे. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे.
आज उस्मानाबाद बंदचे आवाहन
आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाचा काल पाचवा दिवस संपला. अजूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आज उस्मानाबाद बंदचे आवाहन करण्यात आलंय.
पैठणमध्ये शिवसेनेची जाहीर सभा
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त औरंगाबादच्या पैठणमध्ये शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या प्रमुख वक्त्या म्हणून भाषण करणार आहेत. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित असणार आहेत.
आशिष शेलार यांची पत्रकार परिषद
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांची दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
आमदार बच्चू कडू यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर
आमदार बच्चू कडू यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दुपारी १२ वाजता बाभूळगाव येथून दौऱ्याला सुरुवात होईल. नुकसानीची पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.