Kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी, ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाकडून गंभीर दखल, ग्रामसेवकाला धाडली नोटीस
Kanifnath Yatra : पाथर्डी तालुक्यातील मढी येथील ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापार्यांना कानिफनाथ यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला होता.

Kanifnath Yatra : पाथर्डी तालुक्यातील मढी (Madhi) येथील ग्रामसभेत मुस्लीम समाजाच्या व्यापार्यांना कानिफनाथ यात्रेत (kanifnath Yatra) दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला होता. यानंतर ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. गटविकास अधिकार्यांकडून मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
कानिफनाथ यात्रेला मोठी परंपरा आहे. महिनाभर चालणारी ही यात्रा मढी ग्रामस्थांसाठी दुखवट्याचा काळ असतो. पारंपारिक पद्धतीने महिनाभरापूर्वी देवाला तेला लावले जाते. या काळात ग्रामस्थ तेलातील तळलेले पदार्थ खात नाही. पलंग, गादी वापरत नाहीत. मात्र यात्रेतील मुस्लिम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत. यातून भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचते, त्यामुळे मढी ग्रामपंचायतीने मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव मढी येथील ग्रामसभेत करण्यात आला होता. यानंतर ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती.
ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस
यानंतर मढी ग्रामपंचायतीने केलेला ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य असल्याचे दिसत असून याबाबत चौकशी समिती नेमली आहे. ग्रामसेवकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ग्रामसेवक, सरपंच, ठरावाचे सूचक, अनुमोदक आणि ग्रामसभेतील उपस्थित लोकांचे जबाब चौकशी समिती नोंदवणार आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल पाठविला जाईल, असं गटविकास अधिकार्यांकडून सांगण्यात आले आहे.
प्रशासनाकडून गंभीर दखल
दरम्यान, गटविकास अधिकार्यांनी सहायक गटविकास अधिकारी संगिता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. मढी यात्रा ही सर्व जाती-धर्माच्या लोकांची आहे. ही परंपरा सातशे वर्षांची आहे. मात्र ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंविधानिक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता ग्रामसेवकालाचा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीसांची प्रतिक्रिया
अहिल्यानगरच्या मढी ग्रामपंचायतीने आणि देवस्थानने मुस्लिम व्यापार्यांना मढी यात्रेदरम्यान बंदी घालण्याचा ठराव घेतला होता. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी विरोध दर्शविला आहे. यात्रेदरम्यान मुस्लीम व्यापारी परंपरा पाळत नसल्याने ग्रामस्थांकडून व्यापार्यांना बंदी घालण्यात आलीये. मात्र, हे धाद्धांत खोटं असून मढी येथील पावित्र्य राखण्याचे काम सर्व गावकरी आणि भाविक करत असल्याचे ढाकणे यांनी म्हटले आहे. सामाजिक तेढ निर्माण करणं हाच यामागचा हेतू असून ग्रामसभेचा ठराव करणे हे घटनाबाह्य असल्याचे ढाकणे यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या






















