Nagpur Police : गुन्हेगारांचे जामीन घेणारे आणि वकील पुरवणाऱ्यांवरही नागपूर पोलिसांचा 'वॉच'
अटक झालेल्या गुन्हेगाराला न्यायालयातून कठोर शिक्षा मिळेल, याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांना दत्तक देण्याच्या योजनेमुळे गुन्हेगारी मध्ये घट झाल्याचे पोलीस आयुक्तांचे म्हणणे आहे.
Nagpur News : शहरात वाढती गुन्हेगारी, घरफोडीच्या घटनांमुळे चर्चेत असणाऱ्या शहराची ओळख 'गुन्हेपूर' अशी होत असताना नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अनोखं दुहेरी शतक लगावला आहे. या दुहेरी शतकामुळे नागपूर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आल्याचा दावा ही नागपूर पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी गेल्या दीड वर्षात मकोकामध्ये 100 पेक्षा जास्त सराईत गुंडांना तुरुंगात टाकले आहेत. तसेच एमपीडीए (MPDA) (झोपडपट्टी दादा कायदा) मध्ये 100 गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी दिली.
आम्ही नागपूर शहरातील सर्व गॅंगस्टर्स तुरुंगात टाकल्यामुळेच नागपूर शहरातील गुन्हेगारीचे आकडे गेल्या वीस वर्षात सर्वात निच्चांकी पातळीवर पोहोचल्याचा दावा नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. गेल्या दोन दशकातील हत्या आणि हत्येच्या प्रयत्नांच्या प्रकरणाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी हत्याच्या प्रकरणात 40% तर हत्येच्या प्रयत्नांच्या प्रकरणात 30 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. गेल्या दीड वर्षात सर्व सराईत गुन्हेगार तुरुंगात टाकण्यात आले असले. तरी ते भविष्यात लवकर तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाही आणि त्यांना कठोर शिक्षा होईल यासाठी ही नागपूर पोलिसांनी विशेष प्रयत्न चालविले आहे.
गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवरही विशेष लक्ष
एवढेच नाही तर नागपुरात सराईत गुन्हेगारांनी गुन्हा केल्यानंतर कोण त्यांचे जामीन घेतो कोण? त्यांच्यासाठी वकील पुरवतो? याकडेही नागपूर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे. अटक झालेल्या गुन्हेगाराला न्यायालयातून कठोर शिक्षा मिळेल, यासाठी न्यायालयीन लढाईत पाठपुरावा करण्यासाठी महत्त्वाची प्रकरणं वरिष्ठ अधिकाऱ्यांना दत्तकही दिली आहेत. त्यामुळे गुन्हेगारी मध्ये घट झाल्याचे पोलीस आयुक्तांचे म्हणणे आहे.
रिक्त पदांमुळे पोलिसांवरील ताण कायम!
पंधरा दिवसांपूर्वी शहरातील पोलिस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे कामाचा ताण वाढला होता. नुकतेच शहराला दोन पोलिस उपायुक्त मिळाले असले तरी, पोलिस अधिकाऱ्यांवरील ताण कमी होण्याची चिन्हे नाहीत. सध्या तीन पोलिस उपायुक्तांपैकी चिन्मय पंडित यांच्याकडे गुन्हे शाखा, विशेष शाखा, सायबर आणि आर्थिक सेलची जबाबदारी आहे. संदीप पखाले यांच्याकडे परिमंडळ पाच आणि दोनची जबाबदारी आहे. चेतना तिडके यांच्याकडे परिमंडळ 1 आणि वाहतूक शाखेचा कार्यभार आहे.
घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ
दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान शहरात घरफोडीचे सत्र सुरु झाले होते. शहरातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत घरफोडीच्या घटना घडल्या. यापैकी अनेक घटनांमध्ये घरातील सदस्य किंवा काम करत असलेल्या नोकराचा सहभाग असल्याचे उघडकीस आलेल्या काही घटनांमधून दिसून आले. यापैकी काही घटनांचा उलगडा पोलिसांनी केला असला तरी अनेक घटना अद्याप उघड झालेल्या नाही.
महत्त्वाची बातमी