Congress: युवक काँग्रेसच्या सर्व नेमणुका केंद्रीय नेतृत्वाकडून रद्दबातल; बारा तासातच निर्णय फिरला, कुणाल राऊतांवर शिस्तभंग कारवाई?
Maharashtra Politics : महाराष्ट्रात युवक काँग्रेसच्या (Congress) नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व नेमणुका युवक काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने रद्दबातल केल्या आहेत.

Maharashtra Politics : महाराष्ट्रात युवक काँग्रेसच्या (Congress) नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व नेमणुका युवक काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने रद्दबातल केल्या आहेत. युवक काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची परवानगी न घेता आणि आवश्यक प्रक्रियेचा पालन न करता या नियुक्त्या करण्यात आल्या, त्यामुळे या नियुक्त्या रद्द करण्यात येत असल्याचे पत्र युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अजय चिकारा यांनी काढलं आहे.
विशेष म्हणजे युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांच्यावर दडपशाही आणि मनमानी कारभाराचा आरोप काही दिवसांपूर्वी नागपूरातील युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्या अनुषंगाने पक्षातील काही पदाधिकार्यांनी आवाज उचलत वरिष्ठांकडे तक्रार केली होता. तेव्हा त्यांना संघटनेतून काढण्यात आले होते. त्यानंतर आता कुणाल राऊत आणि त्यांच्या टीमने नव्याने केलेल्या नियुक्त्याही वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहे.
कुणाल राऊतांवर शिस्तभंग कारवाई?
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांनी नुकतेच पक्षाच्या व्हॉट्स ॲप ग्रूपवर नव्या पदाधिकाऱ्यांची यादी प्रसारित केली. तसेच, सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देणारी चित्रफितही टाकली होती. यात आठ कार्यकारी अध्यक्ष आहेत. तर तब्बल 22 उपाध्यक्ष, 91 सरचिटणीस आणि 95 सचिव असल्याची माहिती पुढे आली होती. मात्र युवक काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची परवानगी न घेता आणि आवश्यक प्रक्रियेचा पालन न करता या नियुक्त्या करण्यात आल्या, त्यामुळे या नियुक्त्या रद्द करण्यात येत असल्याचे पत्र युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अजय चिकारा यांनी काढलं आहे. परिणामी पक्षाला विश्वासात न घेता कुणाल राऊतांनी परस्पर या नियुक्त्या केल्याने पक्ष आता राऊतांवर शिस्तभंगाची कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोण आहे कुणाल राऊत?
कुणाल राऊत हे माजी ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र असून त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1989 रोजी झाला. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला. एन.एस. यु.आय.चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. तसेच 2018 च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

