Hyderabad Liberation Day 2022 Live: आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन, पाहा सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामाला एक विशेष स्थान आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला, पण हैदराबाद मात्र निजामांच्या गुलामीत कायम होतं.
LIVE
![Hyderabad Liberation Day 2022 Live: आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन, पाहा सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी Hyderabad Liberation Day 2022 Live: आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन, पाहा सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/0292f88617067025915039c3fee46bac166337840926684_original.jpg)
Background
मुंबई : भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्रामाला एक विशेष स्थान आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला, पण हैदराबाद मात्र निजामांच्या गुलामीत कायम होतं. हैदराबाद स्वतंत्र राहिल अशी घोषणा करणाऱ्या निजाम मिर उस्मान अलीने पाकिस्तान सोबत संधान बांधलं होतं. निजामाच्या रझाकारांनी नागरिकांवर अनन्वित अत्याचार सुरू केले होते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबादवर पोलीस कारवाई केली. 'ऑपरेशन पोलो'च्या माध्यमातून केवळ 108 तासांमध्ये त्यांनी निजामाला गुडघ्यावर आणलं आणि हैदराबाद मुक्त केलं. त्याचं स्मरण म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन पाळला जातो.
हैदराबादचा इतिहास
मुघलांच्या काळात म्हणजे 1713 असफ जहाँ याला निजाम-उल-मुल्क अशी पदवी देऊन हैदराबादचा सरदार घोषित करण्यात आलं. नंतर 1798 साली हे संस्थान ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गेलं. हैदराबादच्या निजामांनी सुरुवातीपासूनच ब्रिटिशांची बाजू घेतली, त्यामुळे ब्रिटिशांची त्याच्यावर कायम मर्जी राहिली.
निजाम जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत
हैदराबाद संस्थान हे 82,698 स्क्वेअर किमी वर्ग इतकं मोठं होतं. त्यात आताचा तेलंगणा, आंध्र प्रदेश, मराठवाडा आणि कर्नाटकातील दोन जिल्ह्यांचा समावेश होता. हैदराबादचा वार्षिक महसूल हा त्यावेळी नऊ कोटी रुपये इतका होता. निजामाची गणना त्यावेळच्या जगभरातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत केली जायची. निजाम हा 185 कॅरेटचा जेकब हिऱ्याचा पेपर वेट म्हणून वापर करायचा. हैदराबाद संस्थानावर ब्रिटिशांची मर्जी होती. त्याकाळी हैदराबादची स्वतंत्र टेलिकम्युनिकेशन सिस्टिम, स्वतंत्र रेल्वे आणि अर्थव्यवस्था होती. हैदराबादची 80 टक्के जनता ही हिंदू होती आणि 20 टक्के जनता अल्पसंख्यांक होती. पण निजामाकडील सर्व उच्च पदे आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये अल्पसंख्याकांना स्थान होतं.
हैदराबादने स्वतःला स्वातंत्र घोषित केलं
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी भारतात एकूण 565 संस्थानं होती. त्यापैकी जुनागड, भोपाळ आणि हैदराबाद वगळता सर्व संस्थानांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला. नंतर जुनागडवर कारवाई करण्यात आली तर भोपाळाने भारतात सामील होत असल्याचं जाहीर केलं. पण हैदराबादने मात्र स्वतंत्र राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.
हैदराबादच्या या कृतीमागे पाकिस्तानचा छुपा हात होता. तसेच पोर्तुगालने त्याला पाठिंबा दिला होता. निजामाने अमेरिकेकडे आणि ब्रिटनकडे पाठिंबा मागितला. पण तो त्यांना मिळाला नाही. निजामाने राष्ट्रकुल देशांमध्ये हैदराबादला सदस्यत्व मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच युरोपियन देशांकडून अत्याधुनिक हत्यारांची खरेदी करण्यासाठी छुपे प्रयत्न सुरू केले.
सरदार पटेलांची चिंता
भारताच्या मध्यवर्ती भागात पाकिस्तानसोबत निष्ठा असणारा प्रांत असणं हे भारतीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, तत्कालीन हैदराबाद हे भारताच्या पोटातील कॅन्सर असल्याचं मत गृहमंत्री सरदार पटेल यांनी मांडलं. त्यामुळे हैदराबाद कोणत्याही परिस्थितीत भारतात सामील व्हायलाच हवं या मतावर ते ठाम होते.
रझाकारांचा उच्छाद
निजामने हैदराबादच्या सुरक्षेसाठी रझाकारांचं सैन्य उभं केलं होतं. या रझाकारांचा म्होरक्या होता तो कासिम रिझवी. त्याने संस्थानात नुसता उच्छाद मांडला होता. नागरिकांवर अत्याचार करणे, लुटमारी, जातीय दंगली, खून अशी कृत्ये तो उघड उघड करायचा. निजामाचा त्याला पूर्ण पाठिंबा होता.
कासिम रिझवीची सरदार पटेल यांना धमकी...
भारत स्वातंत्र्य झाल्यावर इतर संस्थांनाप्रमाणे हैदराबादने भारतात विलीन व्हावं असं आवाहन भारत सरकारने केलं होतं. पण निजाम मात्र याच्या विरोधात होता. भारताने त्यासाठी चर्चेची भूमिका घेतली. नोव्हेंबर 1947 सरदार वल्लभभाई पटेल आणि कासिम रिझवीची दिल्लीत भेट झाली. हैदराबादला जर हात लावाल तर महागात पडेल अशी थेट धमकीच त्याने सरदार पटेल यांना दिली. त्यावर तुम्ही जर आत्महत्याच करायचं ठरवलं असेल तर आम्ही कसं काय थांबवणार असं प्रत्युत्तर पटेल यांनी दिलं.
निजामाच्या विरोधात भारतभर रोष
22 मे 1948 रोजी रझाकारांनी गंगापूर स्टेशनवर रेल्वे प्रवाशांवर हल्ला केला, त्यामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडले. त्यामुळे निजामाविरोधात भारतभर रोष निर्माण झाला. आता निजामाविरोधात भारत सरकारने कारवाई करावी यासाठी मोठा दबाव वाढू लागला.
पोलीस कारवाई आणि ऑपरेशन पोलो
हैदराबादमध्ये लष्करी कारवाई करण्यासाठी सरदार पटेल यांनी हालचाली सुरू केल्या. पण या कारवाईला लष्करी कारवाई असे न म्हणता पोलीस कारवाई असं नाव देण्यात आलं. कारण लष्करी कारवाई परकीय राष्ट्राच्या विरोधात केली जाते. हैदराबाद तर भारताचाच भाग आहे, त्यामुळे पोलीस कारवाई करण्याचं ठरलं. यामुळे पाकिस्तानसह इतर देशांची तोंडंही बंद होणार होती.
हैदराबादमध्ये त्यावेळी जगातील सर्वाधिक म्हणजे 17 पोलो ग्राउंड होते. त्यामुळे या कारवाईला 'ऑपरेशन पोलो' असं नाव देण्यात आलं 13 सप्टेंबर रोजी भारतीय लष्कर हैदराबाद मध्ये घुसलं. त्यावेळी गोरखा बटालियनने जबरदस्त आक्रमण केलं. रझाकारांचे सैन्य जेमतेम 24 हजारांच्या आसपास होतं. अवघ्या तीनच दिवसात हैदराबादमधील सर्व प्रमुख ठिकणं भारताच्या ताब्यात आली. भारतीय सैन्याच्या आक्रमणापुढे रझाकार तग धरू शकले नाहीत. 17 सप्टेंबर रोजी म्हणजे पाच दिवसांनी निजामाने शरणागती पत्करली.
भारतीय लष्करांने 108 तासांमध्ये निजामाला गुडघ्यावर आणलं. या कारवाईत भारताचे 66 जवान शहीद झाले तर 1373 रझाकार मारले गेले. निजाम शरण आला, तर कासिम रिझवीला अटक करण्यात आली आणि नंतर त्याला पाकिस्तानमध्ये सोडण्यात आलं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त करून दिला.
Marathwada Mukti Sangram : राष्ट्रध्वजाला बीड पोलिसांच्या वतीने मानवंदना
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बीडमध्ये आज राष्ट्रध्वजाला बीड पोलिसांच्या वतीने मानवंदना करण्यात आली. यावेळी बीड पोलिसांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने परेड संचलन केल. राज्याचे मंत्री संदिपान भुमरे यांनी या परेड संचलनाचं निरीक्षण करून पोलिसांच कौतुक केल आहे
या पर्यटसंचालनात बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस, होमगार्ड, एनसीसी पथक त्याचबरोबर सैनिक शाळेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. दरवर्षी लाल किल्ल्यावर जी परेड होते त्याच पद्धतीचा अनुभव आज बीड जिल्हा पोलिसांनी केलेल्या परेडमधून पाहायला मिळाला. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी आणि ही परेड पाहण्यासाठी बीडमधील तरुण अनेक ज्येष्ठ नागरिकांनी हजेरी लावली होती
Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्तिसंग्रामात बलिदान देणाऱ्या लक्ष्मण परळकर यांच्या स्मारकाची दुरावस्था
बीडच्या वाघीरा गावामध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामात बलिदान देणाऱ्या लक्ष्मण परळकर यांच्या स्मारकांची दुरावस्था झाली आहे. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याकडे तक्रार नोंदवली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील वाघेरा येथील लक्ष्मण मारुती परळकर यांनी देखील मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये आपलं हुतात्मे दिल होत. त्यांच्याच स्मरणार्थ वाघीरा गावात त्यांचं स्मारक उभारण्यात आलं. मात्र या हुतात्मा स्मारकाकडे प्रशासनच दुर्लक्ष झाला असून या ठिकाणी अक्षरश: जनावर बांधण्यात येत आहेत तर सर्वच ठिकाणी घाणीचे साम्राज्य पाहायला मिळतय.
मराठवाडा मुक्ती संग्राम झाला नसता तर देशाच्या नकाशात मध्यभागी एक इस्लामिक राष्ट्र उभं राहिलं असतं- प्रकाश महाजन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विद्यार्थ्यांकडून नोकर भरती झाली पाहिजे यासाठी घोषणाबाजी
नांदेड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विद्यार्थ्यांकडून नोकर भरती झाली पाहिजे यासाठी घोषणाबाजी करत निषेध करण्यात आलाय. नांदेड शहरातील श्रीनगर येथील भाजपच्या कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांनी सरकारने पोलीस भरती, आरोग्य, नोकर भरती करण्यात यावी, यासाठी घोणबाजी केलीय.
हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे- राज ठाकरे
आज हैदराबाद मुक्ती संग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिन आहे. या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक निवेदन लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असं आवाहन केलं आहे. राज ठाकरेंनी म्हटलं आहे की, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)