गडचिरोलीत उपचाराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू; सहा किलोमीटर खाटेवरुन रुग्णालयात घेतली होती धाव
दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी पायपीट करून किंवा खाटेवर उचलून आणावे लागते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण दगावतात. असाच प्रकार भामरागड तालुका मुख्यालयात काल सायंकाळीच्या दरम्यान घडला असून वेळेवर उपचार न मिळाल्याने चार महिन्याच्या गरोदर मातेला आपला जीव गमवावा लागला आहे.
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वातंत्र्याच्या 72 वर्षानंतरही दळणवळणाची साधन नाहीत. दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी पायपीट करून किंवा खाटेवर उचलून आणावे लागते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण दगावतात. असाच प्रकार भामरागड तालुका मुख्यालयात काल सायंकाळीच्या दरम्यान घडला असून वेळेवर उपचार न मिळाल्याने चार महिन्याच्या गरोदर मातेला आपला जीव गमवावा लागला आहे. जया रवी पोदाळी (वय 23) असे मृत महिलेचे नाव असून ती गुंडेनूर येथील रहिवासी होती.
भामरागड हा अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग असून या परिसरात अजूनही पक्के रस्ते आणि नदी-नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या नदीच्या प्रवाहातून जीव धोक्यात घालून पायवाट काढावे लागते. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भामरागड तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहे. अशा परिस्थितीत काल 8 जून रोजी गुंडेनूर गावातील ही महिला शेतात काम करून घरी परतल्यावर अचानक तिला चक्कर आली. त्यानंतर तिला खाटेवर टाकून कमरेभर पाण्यातून वाट काढून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने वैदयकीय अधिकाऱ्यांनी तिला भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. लाहेरी वरून रुग्णवाहिकेने तिला ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ती चार महिन्याची गरोदर माता असून तिला जवळपास चार वर्षांचं मूल आहे. नेमकं मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झाले नसून शवविच्छेदनामंतरच स्पष्ट होणार आहे.
गडचिरोलीत गरोदर मातेची 23 किमी पायपीट, प्रसुतीसाठी नदी नाल्यातून प्रवास
एबीपी माझाने भामरागड तालुक्यातील त्याच भागात एक गरोदर मातेने प्रसूतीसाठी कशा प्रकारे घनदाट जंगल, नदी नाल्याच्या प्रवाहातून वाट काढत तब्बल 23 किलोमीटरचा पायी प्रवास केला होता याची बातमी दाखवली होती. त्या महिलेने प्रसुतीनंतर देखील तिला आपल्या नवजात बाळाला घेऊन अशाच प्रकारे आपल्या गावी जावं लागलं होतं याची बातमी दाखवली होती. मात्र विकास दुर्गम भागातील गावापर्यंत पोहल्याच्या बाता करणारे लोकप्रतिनिधी मात्र यावर बोलण्यास तयार नाहीत. अशा घटना वारंवार घडत असतांना देखील प्रशासन या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
धक्कादायक... प्रसूतीसाठी 23 किमीची पायपीट केलेल्या महिलेला प्रसूतीनंतरही पायपीट करण्याची वेळ