एक्स्प्लोर
धक्कादायक... प्रसूतीसाठी 23 किमीची पायपीट केलेल्या महिलेला प्रसूतीनंतरही पायपीट करण्याची वेळ
एक महिला प्रसूतीसाठी नदी नाल्याच्या प्रवाहातून वाट काढत तब्बल 23 किमी पायपीट करत दवाखान्यात पोहोचली. धक्कादायक म्हणजे प्रसूतीनंतरही त्या महिलेला नवजात बाळाला घेऊन तेवढेच अंतर पायी चालत घर गाठावं लागलं.
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त दुर्गम अशा भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र छत्तीसगढ सीमेवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीमेवरील नक्षलग्रस्त दुर्गम घनदाट जंगलाने वेढलेल्या तुरेमर्का गावातील एक महिला प्रसूतीसाठी नदी नाल्याच्या प्रवाहातून वाट काढत तब्बल 23 किमी पायपीट करत दवाखान्यात पोहोचली. धक्कादायक म्हणजे प्रसूतीनंतरही त्या महिलेला नवजात बाळाला घेऊन तेवढेच अंतर पायी चालत घर गाठावं लागलं.
3 जुलै रोजी तुरेमर्का गावातील रोशनी पोदाटी 23 या गरोदर मातेवर हे संकट आलं. तुरेमर्का हे गाव बिनागुंडापासून पाच किमी अंतरावर आहे. तर भामरागडपासून 40 किलोमीटर. या परिसरात लाहेरीला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्रसूतीची सोयही याच रुग्णालयात असल्याने रोशनी यांना त्या तारखेला येणे आवश्यक होते. गावापासून हे रुग्णालय 23 किलोमीटर दूर आहे.
कच्चा रस्ता आणि नाल्यावर पूल नसल्याने पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. गावातील आशा वर्करने तिला सोबत घेऊन लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला. ती कशीबशी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचली. मात्र तिथे वैद्यकीय सुविधेचा अभाव असल्याने तिला रुग्णवाहिकेने ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या लोकबिरादरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच रात्री डॉ अनघा आमटे यांनी त्या मातेवर यशस्वी प्रसूती केली. रोशनीने एका गोडस मुलीला जन्म दिला.
हे ही वाचा- गडचिरोलीत गरोदर मातेची 23 किमी पायपीट, प्रसुतीसाठी नदी नाल्यातून प्रवास
आज तिला दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे ती माता आपल्या नवजात बाळाला घेऊन परत आपल्या गावी निघाली. तिला लोकबिरादरी दवाखान्यापासून जिथपर्यंत रुग्णवाहिका जाऊ शकते तिथपर्यंत नेण्यात आले. मात्र पुढे रस्ता नसल्याने परत ती माता आपल्या बाळाला घेऊन घनदाट जंगलातून पायवाट करत निघाली. सोबत लाहेरी येथील डॉक्टर देखील होते. मात्र वाटेत एका नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने तिला एका छोट्या लाकडाच्या नावेतून जावं लागलं. पलीकडे गेल्यानंतर परत पायवाटेने प्रवास करत तिनं घर गाठलं.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement