(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cm Uddhav Thackeray : पालखी मार्गावरील अडथळे दूर करणे आपली जबाबदारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पंढरपूर-आळंदी आणि पंढरपूर देहू या पालखी मार्गाच्या चौपदीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडला
पंढरपूर : पालखीमार्गाचा विकास करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ऊन, वारा, पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता आपली परंपरा जोपसणाऱ्या वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार प्रत्येक पावलावर केंद्र सरकाबरोबर आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. पंढरपूर-आळंदी आणि पंढरपूर देहू या पालखी मार्गाच्या चौपदीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडला. 11 हजार कोटी रुपये खर्चून या मार्गांचं चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, वारीचा अनुभव स्वत: घेतला आहे. मी काही वर्षांपूर्वी वारीची एरिअल फोटोग्राफी केली. या माध्यमातून मी भक्तीसागर पाहिला. विठु माऊलीचे विराट दर्शन मी यात पाहिले. अनेक ठिकाणाहून पालख्या पंढरपूरला येतात. हे दृष्य पाहून अनेक नद्या सागराकडे धावत येत असं वाटतं. वाखरी हे या पालख्यांची एकत्र येण्याची जागा. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर मार्ग मोठा करण्याचा निर्णय खूप महत्वाचा आणि मोठा आहे. तिथे सर्व पालख्या एकत्र येऊन भक्तीसागर निर्माण होतो.
वारीने सामाजिक आंदोलनाची पार्श्वभूमी तयार केली: पंतप्रधान मोदी
ऐहिक सुखाच्या मागे न लागता त्यापलिकडे जाऊन देहभान हरपून जाणारे वारकरी जेव्हा या मार्गावरून चालत असतात तेव्हा भक्तीसागराच्या या पाण्याला विठुनामाचा नाद असतो. भक्तीमार्गावरून आजवर आपल्या देशाची वाटचाल झाली आहे. लाखो वारकऱ्यांचे चरणस्पर्श होणारे हे रस्ते आहेत. वारीला जाता आले नाही तरी वारी करून आलेल्या वारकऱ्यांच्या पाया पडून आपण दर्शन घेतो. ही आपली परंपरा आणि ही आपली संस्कृती आहे. वारीने समाजाला दिशा, संस्कृती आणि संस्कार दिले. अनेक शतके परकीय यवनी आक्रमणे झेलून वारीची परंपरा या संप्रदायाने सुरु ठेवली. संस्कार देणाऱ्या या संप्रदायाचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही.